IND vs ENG: ड्रेसिंग रुममध्ये धोनी अचानक पोहोचल्याने भारतीय खेळाडू सरप्राईज

दुसरा टी20 सामना संपल्यानंतर धोनीने खेळाडूंची क्लास घेतली.

Updated: Jul 10, 2022, 02:40 PM IST
IND vs ENG: ड्रेसिंग रुममध्ये धोनी अचानक पोहोचल्याने भारतीय खेळाडू सरप्राईज title=

मुंबई : एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना 10 जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे होणार आहे. तो सामना जिंकून भारतीय संघ इंग्लंडला व्हाईट वॉश देऊ इच्छिते..

सामना संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (M S Dhoni) भारतीय ड्रेसिंगमध्ये खेळाडूंना भेटायला गेला. बीसीसीआयच्या ट्विटर हँडलवरून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये धोनी भारताचा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) आणि इतरांशी संवाद साधताना दिसत आहे.

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतनेही (Rishabh Pant) ट्विटरवर एक खास फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो एमएस धोनीसोबत दिसत आहे. पंत इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सलामीला आला होता.

दुसऱ्या T20 सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 8 विकेट गमावत 170 धावा केल्या. रवींद्र जडेजाने नाबाद 46 आणि रोहित शर्माने 26 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने चार आणि रिचर्ड ग्लीसनने तीन खेळाडूंना बाद केले.

प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 17 ओव्हरमध्ये 121 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 35 आणि डेव्हिड विलीने नाबाद 33 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले.

41 वर्षीय एमएस धोनी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहे. काही दिवसांपूर्वी, 7 जुलै रोजी धोनी पत्नी साक्षी आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत यांच्यासह काही मित्रांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करताना दिसला.

एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनीने भारतासाठी 350 एकदिवसीय, 98 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 90 कसोटी सामन्यांमध्ये 17266 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 108 अर्धशतके आणि 16 शतके झळकावली. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन आयसीसी जेतेपदे जिंकण्यात यश आले.