Nasser Hussain : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 1st Test) यांच्यात खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला आहे. अवघ्या 28 धावांनी रोहित अँड कंपनीला पराभवाचं तोंड पहावं लागलंय. अशातच इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या करियरमधील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक सामना असल्याचं बोललंय. त्यावर आता इंग्लंडच्या क्रिकेट तज्ज्ञांनी भारताच्या पराभवावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच हैदराबाद कसोटीतील पराभव ही भारतासाठी धोक्याची घंटा असावी, असा सूचक इशारा इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (Nasser Hussain) याने दिला आहे.
काय म्हणाला नासिर हुसैन?
टीम इंडियाने पहिल्या डावात 436 धावा केल्या, पण त्याहून अधिक धावा करता आल्या असत्या. भारतीय संघ उत्कृष्ट संघ आहे आणि मला विश्वास आहे की ते पुनरागमन करतील. इतिहास साक्षी आहे की इंग्लंडला इथं जिंकणं सोपं नव्हतं, असं नासिर हुसैन म्हणतो. इंग्लंड संघाकडे कमालीचा आत्मविश्वास आहे आणि त्यांनी तो सिद्ध देखील केलाय. त्यांना खेळपट्टीवरून फरक पडत नाही. त्यांना त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीवर विश्वास आहे, असं नासिर हुसैनने म्हटलं आहे.
मी त्याच्या जिद्दीची प्रशंसा करतो. जर तुम्ही त्यांच्यावर संशय घेतला तर ते अधिक हट्टी होतील आणि अधिक चांगला खेळ दाखवतील. तुम्हाला चुकीचं सिद्ध करण्यासाठी त्यांना बाहेरील गोष्टींची चिंता नसते, असं म्हणत नासिरने इंग्लंड संघाचं कौतूक केलंय.
ऑपी पोपने उत्तम फलंदाजी केली. त्याने स्वत:ला सिद्ध केलंय. पहिल्या डावात अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाला त्याने समजून घेतलं अन् दुसऱ्या डावात त्याने या त्रिकुटासमोर उत्तम फलंदाजी केली. पहिल्या डावानंतर इंग्लंड 190 धावांनी मागे होती. मात्र, पोपने ज्या प्रकारे मैदानात पाय रोवले अन् चौफेर फटकेबाजी केली ही संस्मरणीय खेळी ठरेल. कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दडपणाखाली खेळणं अवघड असतं. मात्र, दुसऱ्या डावात टॉम हार्टलीनेही 7 विकेट्स घेतल्या, हे कौतूकास्पद आहे, असंही नासिर हुसैनने म्हटलं आहे.
रोहित शर्मा म्हणतो...
आम्ही टीम म्हणून फेल ठरलोय. धावा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले नाहीत. मला वाटत होतं की बुमराह आणि सिराजने सामना 5 व्या दिवशी घेऊन जावा. कारण, पाचव्या दिवशी 20 ते 30 धावा करता आल्या असत्या. खालच्या बॅटिंग ऑर्डरने मॅचमध्ये खरोखरच चांगली झुंज दिली, असं रोहित शर्मा पराभवानंतर म्हणाला आहे.