IND VS ENG: गोलंदाजांनी खेचून आणला विजय, असं बदललं मॅचचं चित्र

चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला आहे.

Updated: Sep 6, 2021, 11:07 PM IST
IND VS ENG: गोलंदाजांनी खेचून आणला विजय, असं बदललं मॅचचं चित्र title=

लंडन : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने 157 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता विराट सेनेने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात इंग्लंडला चांगलंच नमवलं. गोलंदाजांनी ज्याप्रकारे कामगिरी केली. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

गोलंदाजांचा 'सुपरहिट' शो

या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडसमोर 368 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीला इंग्लिश संघाचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. पण दुपारच्या लंच टाईमनंतर गोलंदाजांनी सामन्याची दिशा बदलली. शार्दुल ठाकूरने इंग्लंडला पहिला धक्का दिला, त्यानंतर खेळाडूंनी सुटकेचा नि: श्वास सोडला. दुपारच्या लंचपर्यंत इंग्लंडने दोन गडी गमावले होते आणि सामना कोणाकडेही जाऊ शकला असता. पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.

बुमराह आणि जडेजाने इंग्लंडच्या फलंदाजांना क्रीजवर टिकू दिले नाही. योग्य वेळी दोन्ही गोलंदाजांनी संघाचा विजय निश्चित केला. बुमराह त्याच्या फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने दोन फलंदाजांना माघारी पाठवले. जडेजाने आपल्या फिरकीची जादूही पसरवली. त्यानंतर शार्दुल ठाकूरने कर्णधार जो रूटला बाद करत टीम इंडियाला विजयाच्या जवळ आणले. उमेश यादवही मागे राहिला नाही आणि त्यानेही चांगली कामगिरी केली. जडेजा, बुमराह, शार्दुलने 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तर उमेश यादवने 3 बळी घेतले.

भारताची 2-1 अशी आघाडी

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने पुढे गेला आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा पराभव केला. मात्र, तिसऱ्या कसोटीतच इंग्लंडने पुनरागमन केले आणि एकतर्फी पद्धतीने सामना जिंकला. त्यानंतर चौथ्या कसोटीत टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सामना जिंकला.