पुणे टेस्टमध्ये न्यूझीलंडचा मोठा विजय, तब्बल 12 वर्षांनी भारतात टीम इंडियाने गमावली सीरिज

न्यूझीलंडने दुसरा टेस्ट सामना 113 धावांनी जिंकला असून सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली.

पुजा पवार | Updated: Oct 26, 2024, 04:40 PM IST
पुणे टेस्टमध्ये न्यूझीलंडचा मोठा विजय, तब्बल 12 वर्षांनी भारतात टीम इंडियाने गमावली सीरिज  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ 2nd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा पुण्यात पार पडला. पुण्यातील टेस्ट सामान्यांच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना लोळवलं असून दुसऱ्या टेस्ट सामन्यातही भारताचा पराभव केला आहे. न्यूझीलंडने दुसरा टेस्ट सामना 113 धावांनी जिंकला असून सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली. यामुळे टीम इंडियावर तब्बल 12 वर्षांनी भारतात टेस्ट सीरिज गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. 

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलण्ड यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला गेला. यापूर्वी बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. पुणे टेस्टमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडची बरोबरी करेल अशी अपेक्षा होती, मात्र टीम इंडिया या सीरिजमध्ये पुनरागमन करण्यात अयशस्वी ठरली.  यासह न्यूझीलंडने भारतात पहिली टेस्ट सीरिज जिंकून पुण्यात इतिहास घडवला. 2012 पासून घरच्या मैदानावर न पराभूत झालेल्या संघाविरुद्ध हा शतकातील सर्वात मोठा विजय ठरला. 

हेही वाचा : धोनी IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? माहीने स्वतः खुलासा करत दिली मोठी अपडेट

 

न्यूझीलंडने कसा केला टीम इंडियाचा पराभव?

24 ऑक्टोबर रोजी पुणे येथील टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूझीलंडने फलंदाजी करताना 259 धावांची आघाडी घेतली. टीम इंडियापैकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने 7 तर आर अश्विन याने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने फलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर अवघ्या 156 धावा केल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 10 विकेट्स घेऊन टीम इंडियाला 156 धावांवर रोखले. यात मिचेल सॅंटनरने 7 विकेट्स घेतल्या, तर ग्लेन फिलिप्सने 2 तर साऊदीने 1 विकेट घेतली. न्यूझीलंडने दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर 255 धावांची खेळी केली आणि 300 हुन अधिक धावांचे आव्हान टीम इंडियाला दिले. मात्र हे सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच हे आव्हान पूर्ण करण्यात टीम इंडिया अयशस्वी ठरली आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर गडगडली. यामुळे न्यूझीलंडने 113 धावांनी विजय मिळवला. 

शेवटचा टेस्ट सामना कधी? 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 1 ते 5 नोव्हेंबर या दरम्यान हा सामना होणार असून हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्या करता महत्वाचा असणार आहे.