माऊंट मांगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला आहे. याचबरोबर भारताने वनडे सीरिज ३-०ने गमावली आहे. ही सीरिज व्हाईट वॉशने गमावण्याची नामुष्की विराट कोहलीच्या टीमवर आली आहे. सीरिज गमावली असली तरी भारताचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहचा फॉर्म विराट कोहलीसाठी चिंतेचा विषय आहे.
वनडे क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने सगळ्यात खराब कामगिरीची नोंद केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बुमराहला एखाद्या सीरिजमध्ये एकही विकेट मिळालेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये बुमराहने १० ओव्हरमध्ये ५३ रन, दुसऱ्या मॅचमध्ये १० ओव्हर टाकून ६४ रन आणि तिसऱ्या वनडेमध्ये १० ओव्हर टाकून ५० रन दिल्या.
न्यूझीलंडआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही बुमराहला एकच विकेट मिळाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये बुमराहने ७ ओव्हर टाकून ५० रन, दुसऱ्या वनडेमध्ये ९.१ ओव्हरमध्ये ३२ रन देऊन १ विकेट घेतली. तर तिसऱ्या वनडेमध्ये त्याने १० ओव्हरमध्ये ३८ रन दिल्या.
२६ वर्षांचा जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपनंतर दुखापत झाल्यामुळे टीमबाहेर होता. यावर्षी जानेवारी महिन्यात बुमराहने क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. लागोपाठ ४ मॅचमध्ये एकही विकेट न घेण्याची कामगिरीही बुमराहने पहिल्यांदाच केली आहे. मागच्या ६ मॅचमध्ये बुमराहला एकच विकेट घेता आली आहे. २३ जानेवारी २०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध जसप्रीत बुमराहने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.