माऊंट मांगनुई : टी-२० सीरिजमध्ये भारताविरुद्धच्या ५-०ने झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंडने वनडे सीरिजमध्ये घेतला आहे. तिसऱ्या वनडेमध्ये शानदार विजय मिळवत न्यूझीलंडने ही सीरिज ३-०ने खिशात टाकली. मागच्यावर्षी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर भारताने ही पहिलीच सीरिज गमावली आहे.
वनडे सीरिज व्हाईट वॉशने गमावण्यासोबतच भारत आणि कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. १९८८-८९नंतर भारताने पहिल्यांदाच एखादी वनडे सीरिज व्हाईट वॉशने गमावली आहे. १९८३-८४ साली वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने वनडे सीरिज ५-०ने आणि त्यानंतर १९८८-८९ साली पुन्हा वेस्ट इंडिजविरुद्धच ५-०ने वनडे सीरिज गमावली होती. २००६-०७ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा ४-०ने पराभव झाला होता. या सीरिजमधली एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
विराट कोहलीच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भारताला एखाद्या वनडे सीरिजची एकही मॅच जिंकता आली नाही. याआधी २०१४ साली धोनी कर्णधार असताना न्यूझीलंडविरुद्धच भारताला एकही वनडे जिंकता आली नव्हती. ५ मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा ४-०ने पराभव झाला, तर एक मॅच टाय झाली.