मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंडचे दोन खेळाडू जखमी झाल्यानं न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. तर आता टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना काही कारणांमुळे पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 जून रोजी साऊथॅम्प्टन इथे होणार आहे. या सामन्याआधी एक वाईट बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे चाहत्यांची मोठी निराशा होण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्याआधी साऊथॅम्प्टनचे हवामान खूपच खराब असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान अहवालानुसार 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याचा अंतिम सामन्यात परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामने पुढे जाऊ शकतात किंवा त्यांच्या वेळेत बदल होऊ शकतो.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 19 ते 20 जून दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. 19 जून रोजी 2 तास तर 20 जूनला 4 तास पावसाचा अंदाज आहे. हवामानाचा विचार करून ICCने एक दिवस रिझर्व्ह ठेवला आहे. त्यामुळे आता या रिझर्व्ह दिवसाचा वापरही करावा लागण्याची शक्यता आहे.
हवामान बदलल्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांना जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. न्यूझीलंडचे काही गोलंदाज या हवामानातही चांगली गोलंदाजी सहज करू शकतात मात्र टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर हे आव्हान असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचे खेळाडू आपलं कौशल्य वापरून न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी आपली योजना तयार करत आहेत. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.