मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिज नंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेआधी इंग्लंडच्या खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे इंग्लंड क्रिकेट बोर्डनं जुन्या ट्वीटवरून इंग्लंडच्या खेळाडूंवर कारवाई करायला सुरुवात केली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून आता इयोन मॉर्गन आणि जोस बटलरला देखील नारळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचं कारण म्हणजे या दोघांचेही जुने ट्वीट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे आणि आता त्यावर चर्चा होत आहे. बटलर आणि मॉर्गन यांनी भारतीयांची चेष्टा करण्यासाठी या पोस्टमध्ये 'सर' हा शब्द वापरला आहे. ज्यामुळे या पोस्टवर लोकांनी आक्षेप नोदवला आहे.
ओली रॉबिन्सन याला 2012-13 मध्ये आक्षेपार्ह ट्विटसाठी निलंबित केल्यानंतर आता बटलर आणि मॉर्गन यांच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे आणि त्यांचे क्रिकेट करिअर धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बटलरच्या या आक्षेपार्य ट्वीटचा स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो म्हणाला आहेत की,' मी नेहमी सरांना उत्तर देतो, येथे कोणीच तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे नाही.' त्यावर इयोन मॉर्गनने बटलरला टॅग केले आणि लिहिले, 'सर तुम्ही माझे आवडते फलंदाज आहात.' हे ट्वीट जेव्हा त्यांनी एकमेकांना पाठवले तेव्हा, बटलर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत होत, तर मॉर्गन कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार होता.
एका अहवालात म्हटले आहे की, "या ट्वीटच्या नेमक्या संदर्भावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, त्यांना यातून नक्की काय म्हणायचे होते याचा नक्की अर्थ काय हे समोर आलेले नाही. पंरतु हे पोस्ट अशा वेळी लिहिले गेले होते जेव्हा बटलर आणि मॉर्गन इंग्लंडचे प्रस्थापित खेळाडू बनले होते."
या प्रकरणावर योग्य ती करवाई केली जाईल, असे ईसीबीने म्हटले आहे. ईसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आम्हाला आक्षेपार्ह ट्विटबद्दल गेल्या आठवड्यात सतर्क केले गेले होते. म्हणूनच इतर खेळाडूंच्या जुन्या सोशल मीडिया पोस्टवर देखील सार्वजनिकपणे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.' ते म्हणाले, "आमच्या खेळात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणाऱ्यांना स्थान नाही, त्यामुळे आवश्यक असल्यास संबंधित आणि योग्य कारवाई करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."