IND vs NZ: राहुल-नीशम मैदानातच एकमेकांना भिडले

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यामध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला. 

Updated: Feb 11, 2020, 09:19 PM IST
IND vs NZ: राहुल-नीशम मैदानातच एकमेकांना भिडले title=
फोटो सौजन्य : ट्विटर

माऊंट मांगनुई : न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यामध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला. याचसोबत न्यूझीलंडने वनडे सीरिज ३-०ने आपल्या नावावर केली. या मॅचदरम्यान केएल राहुल आणि जेम्स नीशम यांच्यात तणाव पाहायला मिळाला. २०व्या ओव्हरमध्ये केएल राहुलने मिड ऑफच्या दिशेने शॉट मारला. यानंतर बॉलिंग करत असलेला जेम्स नीशम खेळपट्टीच्या मधोमध उभा राहिला, यामुळे राहुलला रन काढताना अडचण आली.

रनपूर्ण केल्यानंतर राहुल नीशमच्या जवळ गेला. राहुल आणि नीशम समोरासमोर येताच दोन्ही अंपायर मध्ये आले. राहुल आणि नीशम यांच्यात हलक्या फुलक्या पद्धतीने शाब्दिक चकमक झाली. यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांकडे बघून हसले आणि आपल्या ठिकाणी निघून गेले.

केएल राहुलने या मॅचमध्ये ११२ रनची खेळी केली. राहुलचं वनडे क्रिकेटमधलं हे चौथं शतक होतं. या शतकासोबतच केएल राहुल द्रविडच्या पंगतीत जाऊन पोहोचला आहे.  राहुल द्रविडनंतर आशिया खंडाबाहेर शतक करणारा केएल राहुल हा दुसरा भारतीय विकेट कीपर ठरला. याआधी राहुल द्रविडने १९९९ वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध १३५ रनची खेळी केली होती.

राहुलने कर्णधार विराट कोहलीचं रेकॉर्डही मोडलं आहे. राहुलने वनडेच्या ३१ इनिंगमध्ये ४ शतकं केली आहेत. विराटला ४ शतकं करायला ३६ इनिंग लागल्या होत्या. या यादीमध्ये शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे. शिखर धवनने फक्त २४ इनिंगमध्ये ४ शतकं केली होती.