माऊंट मांगनुई : केएल राहुलने विकेट कीपिंगला सुरुवात केल्यापासून त्याची तुलना राहुल द्रविडशी होऊ लागली आहे. यावेळी मात्र केएल राहुलने राहुल द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये राहुलने शतक केलं. राहुल द्रविडनंतर आशिया खंडाबाहेर शतक करणारा केएल राहुल हा दुसरा भारतीय विकेट कीपर ठरला. याआधी राहुल द्रविडने १९९९ वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध १३५ रनची खेळी केली होती. एमएस धोनीने आशिया खंडाबाहेर एकही शतक केलेलं नाही.
जानेवारी २०१७ नंतर पाचव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या खेळाडूचं हे पहिलंच शतक ठरलं. एमएस धोनीने जानेवारी २०१७ साली इंग्लंडविरुद्ध कटकमध्ये पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करताना १३४ रन केले होते.
एवढच नाही तर राहुलने विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. राहुलने वनडेच्या ३१ इनिंगमध्ये ४ शतकं केली आहेत. विराटला ४ शतकं करायला ३६ इनिंग लागल्या होत्या. या यादीमध्ये शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे. शिखर धवनने फक्त २४ इनिंगमध्ये ४ शतकं केली होती.
पाचव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर खेळताना न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये शतक करणारा केएल राहुल हा पहिला भारतीय ठरला आहे. तर न्यूझीलंडच्या मैदानात पाचव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर खेळताना शतक करणारा राहुल दुसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी २०१५ वर्ल्ड कपमध्ये सुरेश रैनाने झिम्बाब्वेविरुद्ध शतक केलं होतं.
केएल राहुलच्या या शतकानंतरही भारताला तिसऱ्या वनडेमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. याचसोबत भारताने ही वनडे सीरिज ३-०ने गमावली आहे.