IND vs NZ: पहिल्या टेस्टसाठी मैदानात उतरताच टेलर करणार विश्वविक्रम

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मैदानात उतरताच न्यूझीलंडचा रॉस टेलर विश्वविक्रम करणार आहे.

Updated: Feb 17, 2020, 11:26 PM IST
IND vs NZ: पहिल्या टेस्टसाठी मैदानात उतरताच टेलर करणार विश्वविक्रम

वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मैदानात उतरताच न्यूझीलंडचा रॉस टेलर विश्वविक्रम करणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम अजूनपर्यंत कोणत्याच खेळाडूला जमलेला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ही टेस्ट मॅच रॉस टेलरची १००वी टेस्ट मॅच असेल. १०० टेस्ट, १०० वनडे आणि १०० टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा रॉस टेलर हा एकमेव खेळाडू होणार आहे.

भारताविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये रॉस टेलर शानदार फॉर्ममध्ये होता. रॉस टेलरच्या कामगिरीमुळेच न्यूझीलंडने ही वनडे सीरिज ३-०ने जिंकली. टेलरने ३ मॅचमध्ये १९४ च्या सरासरीने १९४ रन केले. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता.

रॉस टेलरने २३१ वनडे मॅचमध्ये ४८.६६ च्या सरासरीने ८,५६५ रन केले आहेत. तर १०० टी-२० मॅचमध्ये टेलरला २५.८ च्या सरासरीने १९०९ रन करता आले आहेत. टेलरने ९९ टेस्ट मॅचमध्ये ४५.७ च्या सरासरीने ७,११५ रन केले आहेत. रॉस टेलरने वनडे २१ आणि टेस्टमध्ये १९ शतकं केली आहेत.