'फायनल खेळलास तर बोटं कापू', अश्विनला मिळाली धमकी

भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन हा सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.

Updated: Feb 17, 2020, 10:48 PM IST
'फायनल खेळलास तर बोटं कापू', अश्विनला मिळाली धमकी

मुंबई : भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन हा सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्याआधी अश्विनने त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. लहान असताना क्रिकेट स्पर्धेदरम्यान अश्विनला बोटं कापण्याची धमकी मिळाली होती. एका मुलाखतीमध्ये बोलताना अश्विनने त्याच्या आयुष्यात घडलेला हा किस्सा सांगितला आहे.

'टेनिस बॉल फायनल मॅच खेळण्यासाठी मी निघत होतो. तेव्हा रॉयल एनफिल्डवरुन चार-पाच जणं आले. ती माणसं बरीच तगडी होती. त्यांनी मला उचललं आणि आम्ही सांगू तिकडे यावं लागेल असं सांगितलं. तुम्ही कोण आहात? आणि मला कुठे घेऊन जात आहात? असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावेळी आम्ही तुला मॅच खेळायला घेऊन जात आहोत, असं उत्तर त्यांनी दिलं,' असं अश्विन म्हणाला.

'मला घेण्यासाठी रॉयल एनफिल्डवरुन माणसं आली, हे पाहून मला आनंद झाला. मला दोन व्यक्तींच्या मध्ये बसवण्यात आलं होतं. मला एखाद्या सॅन्डविचच्या आतमध्ये टाकल्यासारखं वाटत होतं. त्यावेळी मी १४-१५ वर्षांचा होतो. ती लोकं मला चहाच्या दुकानात घेऊन गेले आणि बेंचवर बसवलं. खायला-प्यायला काय पाहिजे याचीही चौकशी केली.'

'मला मॅच खेळायला जाण्यासाठी उशीर होत आहे, असं मी त्यांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला खरं सांगितलं. आम्ही तुझ्याविरुद्ध मॅच खेळणाऱ्या टीमचे आहोत. तू मॅच खेळू नये असं प्रतिस्पर्धी टीमला वाटत आहे. तू जर मॅच खेळायला गेलास तर तुझी बोटं कापून टाकू, अशी धमकी मला त्यांनी दिली. पण मॅच संपल्यानंतर त्यांनीच मला घरी सोडलं. घरी गेल्यावर वडिलांनी ही लोकं कोण आहेत? असं मला विचारलं. मित्र असल्याचं सांगितल्यानंतर वडिलांनी एवढे तगडे लोकं तुझे मित्र कसे? असा पुढचा प्रश्न वडिलांनी विचारला,' अशी लहानपणीची आठवण अश्विनने सांगितली.