क्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर भारतीय टीम दुसऱ्या टेस्टमध्येही संकटात सापडली आहे. कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या महत्त्वाच्या खेळाडूंचा खराब फॉर्म भारताच्या या कामगिरीला जबाबदार आहे.
मागच्या ४ इनिंगमध्ये अजिंक्य रहाणेने २२.७५च्या सरासरीने फक्त ९१ रन केले आहेत. दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अजिंक्य रहाणेच्या खेळीवर टीका होत आहे. खेळपट्टीवर ५९ मिनिटं टिकल्यानंतर रहाणेने ४३ बॉलमध्ये ९ रन केले. नील वॅगनरच्या आखूड टप्प्याच्या बॉलवर रहाणे बोल्ड झाला.
आऊट होण्याआधीही रहाणे आखूड टप्प्याच्या बॉलवर संघर्ष करताना दिसला. रहाणेच्या या खेळीवर भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंगने निशाणा साधला आहे. रहाणे हा तळाच्या फळीतल्या बॅट्समनसारखा, टेलएंडरसारखा खेळला. रहाणेची ही सगळ्यात खराब खेळी असल्याची टीका हरभजनने केली आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ८९/६ एवढा झाला आहे. हनुमा विहारी ५ रनवर आणि ऋषभ पंत १ रनवर नाबाद खेळत आहेत. ७ रनची आघाडी मिळाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताची सुरुवात पुन्हा खराब झाली. मयंक अग्रवाल ३ रन करुन आऊट झाला. मयंकबरोबर ओपनिंगला आलेल्या पृथ्वी शॉला १४ रन करता आले. चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक २४ रन केले.
न्यूझीलंड दौऱ्यावर संघर्ष करणाऱ्या विराट कोहलीला शेवटच्या इनिंगमध्येही सूर गवसला नाही. विराट कोहली १४ रन करुन माघारी परतला. अजिंक्य रहाणेला नील वॅगनरने ९ रनवर बोल्ड केलं. नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेल्या उमेश यादवलाही एकच रन करता आली. न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने ३ तर टीम साऊदी, नील वॅगनर आणि कॉलिन डिग्रॅण्डहोमला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.