IND vs NZ | न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मात्र आम्ही 2 वेळेस चुकलोच, विराटची कबूली

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह विराटने 1-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. 

Updated: Dec 6, 2021, 03:25 PM IST
IND vs NZ | न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मात्र आम्ही 2 वेळेस चुकलोच, विराटची कबूली

मुंबई : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह विराटने 1-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. या विजयानंतरही विराटने चूक खंत व्यक्त केली आहे. आम्ही 2 वेळेस चुकलो, अशी कबूली विराटने दिली. सामना जिंकल्यानंतर तो माध्यमांशी संवाद साधत होता. यावेळेस तो बोलत होता. (ind vs nz test series 2021 team India captain virat kohli says we are played good cricket except icc t 20 world cup and wtc final 2021)

टीम इंडिया 2 वेळा अपयशी, नक्की कुठे?  

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final 2021) आणि आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 (Icc T20 World Cup 2021) या 2 स्पर्धांचा अपवाद वगळता आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो, असं विराट म्हणाला.

टीम इंडिया गेल्या काही काळापासून सातत्याने चमकदार कामगिरी करतेय. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अपेक्षित अशी कामगिरी करता येत नाहीये. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आले होते.  

विजयाचं संपूर्ण श्रेय कोणाला? 

"मैदानात तेव्हाच सर्वकाही अपेक्षेप्रमाणं होतं, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि सरावावर अधिक भर देता. संघाचे यश हे कोणा एकाचं नसून ते संपूर्ण टीमचं असतं. खेळाडू सातत्याने मेहनत करत राहतील", असा विश्वास विराटने व्यक्त केला.  

प्रत्येक मॅच किंवा सीरिज जिंकणं अशक्य

"ज्या पद्धतीने आम्ही इंग्लंडमध्ये खेळलो तसेच मायदेशात कामगिरी राहिली, त्यातून आम्हाला विश्वास प्राप्त होऊ शकतो. जेव्हा मोठ्या स्पर्धेत खेळतो तेव्हा प्रत्येक सामना किंवा मालिका जिंकू शकत नाही", असं विराटने या वेळेस नमूद केलं. 

"टीम इंडियाने 12 महिन्यात सर्वकाही जिंकावं, अशी अपेक्षा केली जाते. पण हे शक्य नाही. मात्र कुठे सुधारणा करायला हवी, हे आम्हाला माहित असतं. कोणत्या बाबतीत अधिक मेहनत घ्यायला हवी हे आम्हाला ठावूक आहे", असंही विराटने स्पष्ट केलं.

"टीम इंडियाचा स्तर हा नेहमीच उच्च दर्जाचा असायला हवा मग आम्ही खेळो किंवा आणखी कोणी. जेव्हा युवा खेळाडू  खेळायला येतील तेव्हा त्यांचाही दृष्टीकोन असाच हवा. आम्ही वर्षोनवर्ष कसे खेळलो, याचं आम्ही निरिक्षण करतो", असंही विराट म्हणाला.  

विराट काय म्हणाला?