Ind Vs Wi : टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी, गोलंदाजांनी विंडीजची उडवली दाणादाण

आता पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये.

Updated: Jul 30, 2022, 08:55 AM IST
Ind Vs Wi : टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी, गोलंदाजांनी विंडीजची उडवली दाणादाण title=

मुंबई : टीम इंडियाने T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 68 रन्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात टीमच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार रोहित शर्मा, ज्याने 64 धावांची जबरदस्त इनिंग खेळली. टीम इंडियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 190 रन्स केले. मात्र वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये केवळ 122 रन्स केले. आता पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये.

विंडीजसाठी स्पिनर्स ठरले काळ

191 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज टीमने सुरुवातीपासूनच विकेट गमावण्यास सुरुवात केली. अर्शदीप सिंगने प्रथम काईल मायर्सला बाद केलं, त्याच्यानंतर जेसन होल्डरही खातं न उघडताच बाद झाला. वेस्ट इंडिजसाठी रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांची जोडी कर्दनकाळ ठरली.

दोन्ही स्पिनर्सने एकूण चार बळी घेतले, अश्विनने 4 ओव्हरमध्ये फक्त 22 रन्स दिले आणि 2 विकेट्स घेतले. तर रवी बिश्नोईने 4 ओव्हरमध्ये 26 रन्स देत फक्त 2 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजकडून एस. ब्रुक्सने 20, कर्णधार निकोलस पूरनने 18 रन्स केले.

कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक

एकदिवसीय मालिकेतून ब्रेक घेतलेल्या रोहित शर्माने टी-20 मालिकेत कमबॅक केलंय. टी-20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया तयारीमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे रोहित शर्माने विरोधी टीमवर फटकेबाजी केली. रोहितने 64 रन्सच्या खेळीत 7 चौकार, 2 सिक्स मारले.

रोहित शर्माशिवाय फिनिशर दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी केली. मधल्या पळीत जेव्हा टीम इंडियाचा डाव फसला तेव्हा अखेर दिनेश कार्तिकने 19 बॉल्समध्ये 41 रन्सची खेळी करत टीमला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं.