हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. विराट कोहलीच्या नाबाद ९४ रन आणि केएल राहुलच्या ६२ रनमुळे भारताने वेस्ट इंडिजने ठेवलेलं २०८ रनचं आव्हान १८.४ ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताकडून युझवेंद्र चहल सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. चहलने शिमरन हेटमायर (५६ रन) आणि कायरन पोलार्ड (३७ रन) या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. याचसोबत चहल हा टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर झाला आहे. चहलने अश्विनच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.
युझवेंद्र चहलने ३५ मॅचमध्ये २१.२१ च्या सरासरीने ५२ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. अश्विनने ४६ मॅचमध्ये २२.९४ च्या सरासरीने ५२ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय रेकॉर्डमध्ये मलिंगाने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. मलिंगाच्या नावावर १०६ विकेट आहेत. तर शाहिद आफ्रिदीने ९८ आणि शाकिब अल हसनने ९२ विकेट घेतल्या. उमर गुलच्या नावावर ८५ विकेट, सईद अजमलच्या नावावरही ८५ विकेट आहेत.