सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

Updated: Oct 20, 2021, 07:06 PM IST
सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय title=

दुबई : भारतीय टीमने दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतासाठी केअल राहूलने 39 रन, रोहित शर्माने 60 रन, सुर्यकुमार यादवने 38 रन तर हार्दिक पांड्याने 14 रन केले. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 153 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

दुबईत खेळल्या गेलेल्या 2021 टी 20 विश्वचषक सराव सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 5 बाद 152 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, टीम इंडियाने 17.5 ओव्हरमध्ये केवळ एक विकेट गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. रोहित शर्माने भारतासाठी 41 चेंडूत 60 धावांची मॅच विजयी इनिंग खेळली. इतरांना संधी देण्यासाठी तो रिटायर्ड हर्ट झाला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा हा निर्णय सुरुवातीला पूर्णपणे चुकीचा ठरला. डेव्हिड वॉर्नर 01, आरोन फिंच 08 आणि मिशेल मार्श 00 स्वस्तात बाद झाले. मात्र, यानंतर स्टीव्ह स्मिथने जबाबदारी स्वीकारली आणि प्रथम ग्लेन मॅक्सवेलसोबत चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली.

मॅक्सवेल 28 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 37 धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्मिथ आणि मार्कस स्टोइनिसने 72 धावांवर चार विकेट पडल्यानंतर डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. स्मिथने 48 चेंडूत 57 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आले. त्याचबरोबर मार्कस स्टोइनिस 25 चेंडूत 41 धावांवर नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याचवेळी मॅथ्यू वेड एका चेंडूवर नाबाद चार धावा करून परतला.

रविचंद्रन अश्विनने भारतासाठी अवघ्या 8 धावांत दोन बळी घेतले. याशिवाय राहुल चहर, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.