आशिया कप : भारतानं बांगलादेशला लोळवलं

पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर आता भारतीय टीमनं बांगलादेशलाही लोळवलं आहे.

Updated: Sep 21, 2018, 11:48 PM IST
आशिया कप : भारतानं बांगलादेशला लोळवलं

दुबई : पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर आता भारतीय टीमनं बांगलादेशलाही लोळवलं आहे. आशिया कपच्या सुपर-४ मॅचमध्ये भारतानं बांगलादेशला ७ विकेटनं हरवलं आहे. बांगलादेशनं ठेवलेलं १७४ रनचं लक्ष्य भारतानं ३६.२ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून पूर्ण केलं. रोहित शर्मानं नाबाद ८३ तर दिनेश कार्तिकनं नाबाद १ रन केले. एमएस धोनीला ३३, शिखर धवनला ४० आणि अंबाती रायडूला १३ रन करता आले. बांगलादेशच्या मशरफी मुर्तजा, शाकिब अल हसन आणि रुबेल हुसेनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. 

त्याआधी तब्बल वर्षभरानंतर भारतीय वनडे टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानं शानदार कामगिरी केली. यामुळे बांगलादेशचा १७३ रनवर ऑल आऊट झाला. रवींद्र जडेजानं १० ओव्हरमध्ये २९ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारला ३ विकेट आणि जसप्रीत बुमराहला ३ विकेट मिळाल्या. बांगलादेशच्या मेहदी हसननं सर्वाधिक ४२ रन केले.

या मॅचमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलरनी रोहितचा हा निर्णय योग्य ठरवत बांगलादेशला सुरुवातीपासूनच धक्के दिले. ९व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मेहदी हससनं बांगलादेशचा कर्णधार मशरफी मुर्तजाबरोबर पार्टनरशीप केली आणि बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.