'गब्बर'ची जब्बर खेळी, 'बर्थ'डे बॉय' इशानचा तडाखा, टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा

 टीम इंडियाकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक नाबाद 86 धावांची खेळी केली.   

Updated: Jul 18, 2021, 10:45 PM IST
'गब्बर'ची जब्बर खेळी, 'बर्थ'डे बॉय' इशानचा तडाखा, टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा

कोलंबो : टीम इंडियाच्या युवा सेनाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 263 धावांचे आव्हान टीम इंडियाने 36.04 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक नाबाद 86  धावा केल्या. तर पदार्पणवीर इशान किशनने  59 धावांची अर्धशतकी खेळी केली.  (India beats Sri Lanka By 7 wickets in 1st odi at R Premadasa Stadium colmbo)

 

टीम इंडियाची झोकात सुरुवात 

विजयी धावांचं पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची झोकात सुरुवात झाली. सलामीवीर शिखर आणि पृथ्वी शॉ या जोडीने 58 धावांची सलामी भागीदारी केली. सामन्यातील 6 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर आऊट झाला. पृथ्वीने 24 चेंडूत 43 धावांची तडाखेदार खेळी केली. यामध्ये त्याने 9 फोर लगावले. 

इशानचे पदार्पणात अर्धशतक

पृथ्वीनंतर पदार्पणवीर आणि बर्थडे बॉय इशान किशन मैदानात आला. इशानने शिखरला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 रन्स जोडल्या. या भागीदारी दरम्यान इशानने धमाकेदार अर्धशतक लगावलं. मात्र त्यानंतर काहीच चेंडूंनंतर तो आऊट झाला. 

इशानने आपल्या डेब्यू मॅचमध्ये टी 20 प्रमाणे अर्धशतक ठोकलं. त्याने या इनिंगमध्ये  8 फोर आणि 2 कडकडीत सिक्स खेचले. इशाननंतर मनिष पांडे मैदानात आला. मनिषसह शिखरने टीम इंडियाचा स्कोअरबोर्ड धावताच ठेवला. 

दुसऱ्या बाजूला मनिषही त्याला चांगली साथ देत होता. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या. मनिषला चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो 31 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर कॅच आऊट झाला. त्याने 40 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 26 धावा केल्या. 

सूर्यकुमारची संयमी पण आक्रमक खेळी

पांडे आऊट झाल्यानंतर मुंबईकर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्यकुमारने शिखरला टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला. या दरम्यना सूर्याने फटकेबाजी केली. सूर्याने 20 बॉलमध्ये कचकचित 5 फोरसह नाबाद 31 धावा केल्या. तर शिखरने  कॅप्टनची भूमिका चोखपणे पार पाडली. त्याने 95 बॉलमध्ये  6 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 86 धावा केल्या. 

मालिकेत 1-0 आघाडी

दरम्यान या विजयासह टीम इंडियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत  1-0 ने आघाडी घेतली आहे. या सीरिजमधील दुसरा सामना हा 20 जुलैला आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी लंकन टीमसाठी दुसरा सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. तर टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे.