indvsnz|हेमिल्टन : न्यूझीलंड विरुद्ध भारत सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाची विजयी घौडदौड थांबवली. न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या अवघ्या 93 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 2 विकेट गमावत 14.4 ओव्हर्स मध्ये पूर्ण केले. न्यूझीलंडच्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी परिस्थिती झाली आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक नाबाद 37 धावा या रॉस टेलरने केल्या. तर हेन्री निकोल्सने नाबाद 30 धावा केल्या.
New Zealand beat India by eight wickets!
Henry Nicholls and Ross Taylor chase down the paltry target of 93 in just 14.4 overs in the fourth ODI at Seddon Park.#NZvIND SCORECARD https://t.co/goloMnOKex pic.twitter.com/3Bjxpfzpj8
— ICC (@ICC) January 31, 2019
भारताने विजयासाठी दिलेल्या 93 धावांच्या लक्षाचा पाठलाग करायला आलेल्या यजमान न्यूझीलंडला पहिला झटका 14 धावांवर बसला. सलामीवीर मार्टिन गुप्टील 14 धावा करुन बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. यानंतर आलेल्या केन विल्यमसन ला भुवनेश्वरने बाहेरचा रस्ता दाखवला. विल्यमसन 11 धावा करुन बाद झाला. यानंतर हेन्री निकेोल्स आणि रॉस टेलर यांच्यात तिसऱ्या विकटेसाठी 54 धावांची नाबाद विजयी भागीदारी झाली. भारताकडून दोन्ही विकेट भुवनेश्वर कुमारने घेतल्या.
नाणेफेक जिंकत यजमान न्यूझीलंडने भारतीयं संघाला फलंदाजीसाठी भाग पाडले. आणि त्यांचा गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवला. न्यूझीलंडने आपल्या भेदक गोलंदाजी समोर भारताच्या फलंदाजीला सुरंग लावला.
फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात सावध झाली. पण यात सातत्य ठेवता आले नाही. भारताचा पहिला विकेट 21 धावांवर गेला. पहिल्या दोन सामन्यात तुफानी अर्धशतकी खेळी करणारा शिखर धवन अवघ्या 13 धावा करुन बाद झाला. यानंतर भारतीय संघाच्या पडझडीला सुरुवात झाली. भारताच्या सात फलंदाजाना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. तर या सातपैकी मधल्या फळीतील रायुडु आणि दिनेश कार्तिकला भोपळा देखील फोडता आला नाही. भारताच्या अनुक्रमे 3 ते 5 विकेट या 33 धावांवरच गेल्या. भारताच्या कोणत्याच फलंदाजाला 20 धावा देखील करता आल्या नाही.
भारताकडून सर्वाधिक धावा या, फिरकीपटू युजवेंद्र चहालने केल्या. त्याने नाबाद 18 धावांची खेळी केली. या खालोखाल गेल्या सामान्यात पुनरागमन केलेल्या हार्दिक पांड्याने 16 धावा केल्या. तर कुलदीप यादवने 15 धावांची कामगिरी केली. या तिन्ही गोलंदांजांच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 93 धावांचे आव्हान देता आले. शेपटीच्या फलंदाजांनी भारताची अब्रु वाचवली. न्यूझीलंडकडून सर्वाधिक 5 विकेट्स या ट्रेन्ट बोल्ट्ने घेतल्या. तर कॉलिन डी ग्रॅण्डहोम याने 3 तर टॉड अॅस्टेल आणि जेम्स निशम या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
तिसऱ्या सामान्यात विजय मिळवून मालिका खिश्यात घालणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. चौथ्या सामन्यासाठी काही बदल केले. विराट कोहलीला चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी आणि टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने आराम दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व चौथ्या आणि पाचव्या सामन्याचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तसेच धोनीचा देखील या सामन्यात समावेश नव्हता. धोनीच्या जागी संघात दिनेश कार्तिकला यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली. तर मोहम्मद शमीच्या जागी खलील अहमदला संधी मिळाली. तर शुभमन गिल या नव्या दमाच्या खेळाडूने भारतीय संघात पदार्पण केले.