India Predicted Playing XI Nepal in Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेमधील भारताचा आज दुसरा सामना असून भारत नेपाळविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. मात्र हा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताच्या खात्यावर एकच गुण आहे. आज भारत नेपाळविरुद्ध मैदानात उतरणार असून हा सामना जिंकणं भारताला आवश्यक आहे. भारत आणि नेपाळचा संघ पहिल्यांच क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने येणार आहेत. भारताचा प्रमुख गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराहला पुत्ररत्नप्राप्ती झाल्याने तो अचानक भारतात आला आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळेच आता त्याची उणीव कोण भरुन काढणार? त्याच्या जागी रोहित कोणाला संधी देणार हा प्रश्न कायम आहे.
भारताला नेपाळविरुद्धचा सामना हा तुलनेनं सोपा असेल असं एकंदरित चित्र दिसत असलं तरी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला नेपाळसारख्या दुबळ्या संघासमोर उत्तम कामगिरी करता आली नाही तरीही आगामी स्पर्धेचा विचार करता भारतीय संघाचा आत्मविश्वास डळमळू शकतो. म्हणूनच हा सामना भारतीय संघ व्यवस्थापन हलक्यात घेणार नाही. यासाठीच या सामन्यात कोणते 11 खेळाडू खेळणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल पाहूयात...
भारताच्या प्लेइंग इलेव्हनआधी गुणांबद्दल बोलायचं झालं तर भारताला या स्पर्धेमधील एकमेव सामना अनिर्णित राहिल्याने त्यामधून एक गुण मिळाला आहे. तर नेपाळने गुणांचं खातं उघडलेलं नाही. पाकिस्तानने नेपाळवर आपल्या पहिल्याच सामन्यात 238 धावांनी मिळवलेला विजय आणि भारताविरुद्धच्या सामन्यात वाटून मिळालेला 1 गुण यामधून 3 गुण मिळाले असून पाकिस्तानी संघ 'सुपर-4'साठी पात्र ठरला आहे. म्हणजेच भारताला आजचा सामना 'सुपर-4'मध्ये जाण्यासाठी जिंकावच लागणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तरी भारत 'सुपर-4'साठी पात्र ठरेल. मात्र भारताचा पराभव झाला तर स्पर्धेतून गच्छंती निश्चित आहे. नेपाळच्या खेळाडूंना हलक्यात घेणं भारताला महागात पडू शकतं. म्हणूनच सर्वोत्तम संघ निवडण्याला रोहितचं प्राधान्य असेल.
नक्की वाचा >> नेपाळला लिंबू-टिंबू समजणं महागात पडू शकतं! 'हे' 6 खेळाडू टीम इंडियाला देतील धक्का
भारतीय संघामध्ये जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद शमीला वेगवान गोलंदाज म्हणून नेपाळविरुद्ध संधी मिळू शकते. भारतीय संघामध्ये हा एकमेव बदल होईल अशी दाट शक्यता आहे. याशिवाय मागील सामन्यातीलच खेळाडू या सामन्यात खेळताना दिसतील.
> रोहित शर्मा
> शुभमन गिल
> विराट कोहली
> श्रेयस अय्यर
> इशान किशन
> हार्दिक पंड्या
> रविंद्र जडेजा
> शार्दुल ठाकूर
> कुलदीप यादव
> मोहम्मद सिराज
> मोहम्मद शमी