India vs Australia : ५२१ रन्स ठोकून पुजारा बनला 'प्लेअर ऑफ द सीरिज

तब्बल तीस वर्षांनी ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की ओढवलीय

Updated: Jan 7, 2019, 10:02 AM IST
India vs Australia : ५२१ रन्स ठोकून पुजारा बनला 'प्लेअर ऑफ द सीरिज title=

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या आणि शेवटचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला आणि भारतानं ऑस्ट्रेलियावर सीरिजमध्ये २-१ अशा फरकानं मात केली. आणि त्यासोबतच भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचलाय. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतानं प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. टीम विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाला चार कसोटीच्या मालिकेत २-१नं पराभूत करत ही ऐतिहासिक कामगिरी केलीय. तब्बल तीस वर्षांनी ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की ओढवलीय.

यानंतर भारताच्या चेतेश्वर पुजारा याला 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सीरिज' म्हणून गौरविण्यात आलंय. संपूर्ण टेस्ट मॅचमधल्या ५२१ रन्ससाठी (सरासरी ७४) त्याला हा किताब देण्यात आलाय. तर शेवटच्या सिडनी टेस्टमध्ये पुजाराचं द्विशतक थोडक्यात हुकलं... या टेस्टमध्ये पुजारानं १९३ ची दमदार खेळी केली.

हा आमच्या सर्वांसाठीच खूप खास क्षण आहे. ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर विजय मिळवणं कधीच सोपं नव्हतं... आम्ही ही सीरिज जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली... आणि माझ्या स्वत:च्या कामगिरीवरही मी समाधानी आहे. माझ्यासाठी माझं पहिलं शतक महत्त्वाचं ठरलं... ऍडलेड इथं शतकाची खेळी करणं हे तर आमचं लक्ष्य असतं... असं म्हणत चेतेश्वर पुजारानं आपल्या भावना व्यक्त केल्या. 

तयारी ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची होती... आणि मी यासाठी तयार होतो... यासोबतच मी आमच्या सर्व बॉलर्सचंही अभिनंदन करतो... आमच्याकडे केवळ चार बॉलर्स होते आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानात २० विकेट घेणं ही काही साधीसुधी कामगिरी नाही... त्यामुळे हे सगळं श्रेय फास्ट बॉलर्स आणि स्पिनर्सचं आहे... असं म्हणत चेतेश्वरनं आपल्या सर्वोत्कृष्ट खेळीसाठी आपल्या सहकाऱ्यांचेही आभार मानले. 

पुढच्या प्लान्सबद्दल सांगताना, यानंतर आता जवळपास ६-७ महिन्यांनी टेस्ट सीरिज खेळणार आहे... त्यामुळे त्यासाठी तयारी करण्यासाठी मला वेळही मिळेल. क्रिकेटच्या इतर फॉर्मेटमध्ये मला खेळायला आवडेल पण टेस्ट क्रिकटला नेहमीच माझं प्राधान्य राहिलंय आणि राहिलं, असंही चेतेश्वर पुजारा यानं म्हटलंय.