७२ वर्षांनंतर जिंकलो रेssss, विराट सेनेचा ऑस्ट्रेलियात डंका

चौथा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला आणि....

Updated: Jan 7, 2019, 09:43 AM IST
७२ वर्षांनंतर जिंकलो रेssss, विराट सेनेचा ऑस्ट्रेलियात डंका  title=

मुंबई : ऑस्ट्रेलिय़ातील सिडनी येथे सुरु असणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील चौथा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला आणि अखेर भारतीय संघाच्या वाट्याला बहुप्रतिक्षित असा ऐतिहासिक विजय आलाच. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना हा अनिर्णित राहिला आणि तब्बल ७२ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला नमवत मालिका जिंकली. 

सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. अखेर वरुणराजापुढे सगळ्यांनाच नमतं घ्यावं लागलं आणि विजय़ी मोहोरेमुळे भारतीय संघाचं पारडं जड झालं. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्य़ा भारतीय क्रिकेट संघातील बऱ्याच खेळाडूंनी साजेशी कामगिरी केली. याच कामिगिरीसाठी चेतेश्वर पुजारा याला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. 

चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर धावांचा डोंगर उभा केला होता. ज्यामध्ये चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत १५०हून अधिक धावा केल्या होत्या. द्विशतकाने त्याला हुलकावणी दिली असली तरीही संघासाठी त्याची कामगिरी ही तितकीच महत्त्वाची ठरली. त्याच्यासोबतच ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेडा या दोघांच्याही अनुक्रमे १५९ आणि ८२ धावांच्या बळावर चौथ्या कसोटीत भारताचा डाव घोषित करण्यात आला होता. 

पहिल्या सामन्यापासूनच भारतीय संघाच्या गोलंदाजांचीही दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली होती. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्याचं पाहायला मिळालं. भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय पाहता ऑस्ट्रेलियात तब्बल ७२ वर्षांनंतर जिंकलो रेssss.... अशी ग्वाची देणं वावगं ठरणार नाही.