स्वस्तात आऊट झाल्यावरही रोहितचा विक्रम, सचिन-विराटला मागे टाकलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला.

Updated: Jan 15, 2020, 11:25 AM IST
स्वस्तात आऊट झाल्यावरही रोहितचा विक्रम, सचिन-विराटला मागे टाकलं

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. भारताने ठेवलेल्या २५६ रनच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता केला. ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी नाबाद शतकी खेळी केल्या. ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्धचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला. रोहित शर्मा १० रन करुन आऊट झाला. स्वस्तात आऊट झाला असला तरी रोहितने नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सगळ्यात जलद १ हजार रन पूर्ण करण्याचा विक्रम रोहितने केला आहे. रोहितने भारतात १८ वनडे इनिंगमध्ये १ हजार रन पूर्ण केले. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावावर होता. सचिन आणि विराटने १९-१९ इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ हजार रन केले होते. तर इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने घरच्या मैदानात २५ वनडेमध्ये १ हजार रन केले.

भारतातल्या मैदानांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक रन करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने ३० इनिंगमध्ये १,५६१ रन केले. तर विराटने १९ इनिंगमध्ये १,०३२ रन केले आहेत. रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर धोनीने ३० इनिंगमध्ये ९२६ रन केले.

भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने ४, विराटने ५ आणि रोहितने ३ शतकं केली आहेत. रोहितने वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३८ वनडे मॅचमध्ये २,०४७ रन केले आहेत.