मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजची पहिली मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी वनडे क्रिकेटमध्ये प्रत्येकी १२४-१२४ कॅच पकडले आहेत. द्रविडने ३४० मॅचमध्ये तर कोहलीने २४२ मॅचमध्ये हे रेकॉर्ड केलं आहे. भारताकडून मोहम्मद अजहरुद्दीनने ३३४ मॅचमध्ये १५४ कॅच तर सचिन तेंडुलकरने ४६३ मॅचमध्ये १४० कॅच पकडले आहेत.
या मॅचमध्ये विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. विराटने या मॅचमध्ये शतक केलं तर भारतात वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिनच्या विक्रमाशी विराट बरोबरी करेल. वनडेमध्ये ४९ शतकं करणाऱ्या सचिनच्या नावावर भारतात २० शतकं आहेत, तर विराटने भारतात १९ शतकं केली आहेत.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३७ वनडे मॅच खेळल्या आहेत. यातल्या ३५ इनिंगमध्ये विराटने ८ शतकं केली आहेत. यातली ५ शतकं भारतातच केलेली आहेत. विराटची कोणत्याही टीमविरुद्ध भारतातली ही सर्वाधिक शतकं आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धही विराटने भारतात ५ शतकं केली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच विराटने सर्वाधिक ९ शतकं केली आहेत.