ब्रिस्बेन : भारतीय टीमच्या बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्याला बुधवारी म्हणजेच २१ नोव्हेंबरपासू सुरुवात होत आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात या दोन्ही टीममध्ये पहिला टी-२० सामना रंगेल. या दौऱ्यामध्ये भारत पहिले ३ टी-२० मॅच मग ४ टेस्ट मॅच आणि यानंतर ३ वनडे मॅचची सीरिज खेळेल. भारतीय वेळेनुसार दुपारी १.२० वाजता ही मॅच सुरु होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या सीरिजच्या मॅच टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तर मॅचचं ऑनलाईन स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर दिसेल.
पहिल्या टी-२० साठी भारतीय टीमची १२ खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. १६ खेळाडूंमधल्या भारतीय टीममध्ये श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वॉशिंगटन सुंदर आणि उमेश यादवला पहिल्या १२ खेळाडूंमध्ये समाविष्ट केलं गेलेलं नाही.
भारतीय टीम : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, युजवेंद्र चहल
२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कप आधी भारत फक्त १३ मॅच खेळणार आहे. त्यामुळे वनडे टीममध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार नाहीत, असं वक्तव्य भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा मुकाबला करायला आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीनं दौऱ्यावर जाण्याच्या आधी दिली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथच्या अनुपस्थितीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याची चांगली संधी आहे. कोणत्याही भारतीय टीमला ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकता आली नाही.
विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी आराम देण्यात आला होता. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराटचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्मा आणि मुरली विजयचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
पहिली टी-२०- २१ नोव्हेंबर, गाबा- भारतीय वेळेनुसार दुपारी १.२० वाजता
दुसरी टी-२०- २३ नोव्हेंबर, एमसीजी, मेलबर्न- भारतीय वेळेनुसार दुपारी १.२० वाजता
तिसरी टी-२०- २५ नोव्हेंबर, एससीजी, सिडनी- भारतीय वेळेनुसार दुपारी १.२० वाजता
पहिली टेस्ट- ६ डिसेंबर ते १० डिसेंबर, ऍडलेड - भारतीय वेळेनुसार पहाटे ५.३० वाजता
दुसरी टेस्ट- १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर, पर्थ- भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता
तिसरी टेस्ट- २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर, मेलबर्न- भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता
चौथी टेस्ट- ३ जानेवारी ते ७ जानेवारी, सिडनी- भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता
पहिली वनडे- १२ जानेवारी, सिडनी- भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता
दुसरी वनडे- १५ जानेवारी, ऍडलेड- भारतीय वेळेनुसार सकाळी ८.५० वाजता
तिसरी वनडे- १८ जानेवारी, मेलबर्न- भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार