ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टी-२० सीरिजला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया खेळाबरोबरच त्यांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी मैदानात उतरेल. भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये आम्ही स्लेजिंग करणार नाही. पण कठोर क्रिकेट खेळू, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचनं दिली आहे. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीनंही आम्ही स्लेजिंग करणार नाही पण त्यांनी सुरु केलं तर आम्हीही ऐकून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात पहिली टी-२० मॅच होणार आहे.
कठोर क्रिकेट खेळण्याचा अर्थ तोंडानं बोलणं असा होत नाही. ती आपली शारिरिक भाषा असू शकते. मैदानातली तुमची उपस्थिती असू शकते. तसंच बॉल हातात असताना तुम्ही काय करता तेही असू शकतं. अशाप्रकारच्या आक्रमकतेला कठोर क्रिकेट म्हंटलं गेलं पाहिजे, असं वक्तव्य फिंचनं केलं आहे.
गेल्या काही कालावधीपासून आमची कामगिरी चांगली झालेली नाही. पण यामध्ये आता बदल होईल अशी अपेक्षा असल्याचं फिंच म्हणाला. अनेकवेळा फक्त एक खेळी, एखादा चांगला बॉलिंग स्पेल किंवा फिल्डिंगमुळेही चित्र पालटू शकतं, अशी प्रतिक्रिया फिंचनं दिली.
स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या गैरहजेरीत भारताला टी-२० सीरिज हरवण्याची चांगली संधी ऑस्ट्रेलियाकडे असल्याचं फिंचला वाटतंय. आम्ही युएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध हरलो पण झिम्बाब्वेविरुद्ध आमची कामगिरी चांगली झाली. भारतही गेल्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आक्रमक खेळ करून भारताला आव्हान देण्याची संधी आमच्याकडे आहे, असं वक्तव्य फिंचनं केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं सगळे फास्ट बॉलर मैदानात उतरवले होते. पण भारताविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांनी एका स्पिनरला संधी दिली आहे. या मैदानाचा आकार आणि स्पिनरनं केलेल्या चांगल्या प्रदर्शनामुळे आम्ही हा निर्णय घेतला. या मैदानावर वेग आणि उसळी मिळते. भारतीय बॅट्समनना हे माहिती आहे. या मैदानातली बाऊंड्रीही लांब आहे, त्यामुळे रणनितीमध्ये बदल होतील, असं फिंच म्हणाला.