Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा कसोटी सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी रेकॉर्डसचा अक्षरश: पाऊस पडला. दोन्ही संघांमधील हा 100 वा कसोटी सामना आहे. विराट कोहलीचा (Virat Kohli) हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असून, महान भारतीय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. विराट कोहली सध्या 87 धावांवर नाबाद आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसलाही मागे सोडलं आहे.
विराट कोहली व्यतिरिक्त तरुण खेळाडू यशस्वी जैसवाल आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माने पहिल्या दिवशी रेकॉर्ड रचला आहे. जाणून घ्या भारतीय फलंदाजांनी रचलेले चार टॉप रेकॉर्ड -
विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 87 धावा केल्या आहेत. विराट कोहली नाबाद असून दुसऱ्या दिवशी पुन्हा मैदानात खेळण्यास उतरेल. दरम्यान, आपल्या 87 धावांसह विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार 548 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला मागे टाकलं आहे. कॅलिसने 519 सामन्यात 25 हजार 534 धावा केल्या.
विराट कोहली पाचव्या क्रमांकावर असून चौथ्या क्रमांकावर महिला जयवर्धने आहे. त्याच्या नावे 652 सामन्यात 25 हजार 957 धावा आहेत. दरम्यान, सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजार 357 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये आघाडीचा फंलदाज म्हणून 2 हजार धावा पूर्ण केल्या. फक्त 40 डावात रोहित शर्माने हा रेकॉर्ड केला आहे. सर्वाधिक कमी डावात अशी कामगिरी करणााऱ्या रोहित शर्माने राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. दोन्ही फलंदाजांनी 40-40 डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.
वेस्ट इंडिजविरोधातील सामना सुरु होताच विराट कोहलीने एका अनोख्या रेकॉर्ड्ला गवसणी घातली. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणारा 10 वा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने 111 कसोटी , 274 एकदिवसीय आणि 115 सामने खेळले आहेत. विराटच्या आधी 6 फलंदाज आणि 3 अष्टपैलू खेळाडूंनी 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
युवा फलंदाज यशस्वी जैसवाल कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन डावात सर्वाधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या डावात 171 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 57 धावा केल्या आणि बाद झाला. त्याने 2 डावात 228 धावा ठोकल्या.
दोन डावात सर्वाधिक धावा कऱणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुली (267) आणि रोहित शर्मा (288 ) आहे. दरम्यान., यशस्वीने शिखर धवन (210), पृथ्वी शॉ (204), सुरेश रैना (182) आणि राहुल द्रविड़ (179) यांना मागे टाकलं आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी भारताने चार गडी गमावत 288 धावा केल्या. विराट कोहली 87 धावांवर नाबाद असून त्याच्यासह रवींद्र जाडेजा 36 धावांसह मैदानात आहे.