मुंबई : भारतात क्रिकेटला देवाचं स्थान प्राप्त झालं आहे. जाणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक या खेळाला चाहत्यांचं प्रेम मिळालं आणि क्रिकेटची मुळं भारतात अगदी घट्ट झाली. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच देशात आता महिलांच्या क्रिकेटलाही सुगीचे दिवस आले आहेत. एकिकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघ गटांगळ्या खाताना दिसत असतानाच महिला क्रिकेट संघ मात्र प्रशंसनीय कामगिरी करताना दिसतो. अशा वेळी एक नाव समोर येतं, ते नाव म्हणजे संघाची कर्णधार मिताली राज.
जगभरात मिताली राजच्या नावाचीच चर्चा आहे. तिच्या नावे अनेक विक्रमांचीही नोंद आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर, अशी उपमा तिला दिली जाते. क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या याच मितालीच्या खासगी आयुष्याबद्दल नुकताच एक मोठा खुलासा झाला.
क्रिकेटच्या विश्वात नाव उंचावणाऱ्या मितालीनं तिची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली. पण, हा खेळ तिचं पहिलं प्रेम नव्हता. वडिलांच्या आग्रहापोटी ती या खेळात आली होती. तिला मुळात नृत्य करण्याची फारच आवड होती. लहानपणापासूनच एक डान्सर होण्याची तिची इच्छा होती.
भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेणारी मिताली नृत्यकलेत नव्हे तर क्रीडा क्षेत्रात पुढे आली. वयाची 38 वर्षे होऊनही मिताली आजही अविवाहित आहे. तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेकदा काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अशा प्रश्नांची मितालीनं एका मुलाखतीत उत्तरं दिली होती. ‘बऱ्याच काळापूर्वी जेव्हा मी लहान होते त्यावेळी माझ्या मनात (हा) विचार आला होता. पण, आता मात्र मी विवाहितांना पाहते तेव्हा असा कोणताही विचार माझ्या मनात येत नाही. मी सिंगलच फार चांगली आहे, आनंदी आहे’ असं मिताली म्हणाली होती.