Who is Akash Deep: वडिलांपाठोपाठ भाऊही गेला; आई अन् पोटासाठी 3 वर्ष सोडलं क्रिकेट; तरीही लढला अन् अखेर जिंकला

आकाश दीप (Akash Deep) भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा 313 वा खेळाडू ठरला आहे. रांचीमधील इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यातून त्याने भारतीय संघात पदार्पण केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 23, 2024, 03:04 PM IST
Who is Akash Deep: वडिलांपाठोपाठ भाऊही गेला; आई अन् पोटासाठी 3 वर्ष सोडलं क्रिकेट; तरीही लढला अन् अखेर जिंकला title=

Who is Akash Deep: भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली आहे. रांचीमध्ये हा सामना खेळला जात असून दुसऱ्या कसोटी सामन्याच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या जादी आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. आकाश दीपसाठी हा क्षण म्हणजे स्वप्नवत आहे. याचं कारण भारतीय संघातून खेळतानाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत. रांचीमधील हा सामना त्याच्यासाठी आयुष्याचा नवा टर्निग पॉईंट ठरला आहे. आकाश दीप जेव्हा मैदानात होता, तेव्हा मैदानाबाहेर उभी राहून त्याची आई तो क्षण डोळ्यात सामावून घेत होती. 

आकाश दीपला भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या हस्ते टोपी देण्यात आली. भारत अ संघात केलेल्या कामगिरीमुळेच आकाश दीपला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. संघर्ष करत पोहोचलेल्या आकाश दीपसाठी हा प्रवास फार काही सोपा नव्हता. ही टोपी मिळवण्यासाठी त्याला अनेक अडथळे पार करावे लागले आहेत. एकेकाळी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्याला 3 वर्षांसाठी क्रिकेट सोडावं लागलं होतं. 

आकाश दीप मूळचा बिहारचा आहे. आकाश दीपला क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. पण त्याच्या वडिलांनी त्याला कधीच प्रोत्साहन दिलं नाही. याउलट ते नेहमी त्याला क्रिकेटपासून दूर करत होते. वडिलांकडून पाठिंबा मिळत नसतानाही आकाश दीप नोकरी शोधण्यासाठी दुर्गापूरला गेला होता. पण त्याच्या नात्यातील एका काकांनी मदतीसाठी हात पुढे केला. 

यानंतर आकाश दीपने स्थानिक अकादमीत प्रवेश घेतला. तिथे त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. पण आकाश दीप आपल्या कौशल्याचं रुपांतर एखाद्या मोठ्या संधीत करण्याच्या प्रयत्नात असतानाच वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर दोन महिन्यांनी त्याच्या मोठ्या भावाचंही निधन झालं. 

आकाशच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला होता. वडील आणि भाऊ गेल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावली होती. आईची काळजी घेण्यासाठी घऱी कोणीच नव्हतं. यामुळे आकाशला कुटुंबाचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी तीन वर्ष क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. आकाशने आयुष्याला नव्याने कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. पण क्रिकेटवरील त्याचं प्रेम त्याला दूर जाऊ देत नव्हतं. 

तो पुन्हा एकदा दुर्गापूरला परतला आणि यानंतर कोलकात्याला गेला. तिथे तो आपल्या चुलत भावांसह एका भाड्याच्या छोट्या खोलीत राहत होता. आकाशने अंडर-23 बंगाल संघात प्रवेश केला. 2019 मध्ये त्याने पदार्पण केलं. यानंतर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने त्याला 2022 मध्ये संघात घेतलं आणि संधी दिली. आणि आज 23 फेब्रुवारी 2024 रोजी तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 313 वा खेळाडू ठरला आहे.