पोरगं बापावर गेलंय! राहुल द्रविडच्या लेकाने लगावला टोलेजंग षटकार; VIDEO पाहून नेटकरी भारावले

Maharaja T20 KSCA स्पर्धेत समित द्रविडने टोलेजंग षटकार लगावत क्रिकेट रसिकांच लक्ष वेढून घेतलं. त्याने लगावलेल्या षटकाराचा वीडियो तुफान वायरल झाला  असून नेटकरी त्याची तुलना राहुल द्रविडशी करत आहेत.

शिवराज यादव | Updated: Aug 17, 2024, 04:53 PM IST
पोरगं बापावर गेलंय! राहुल द्रविडच्या लेकाने लगावला टोलेजंग षटकार; VIDEO पाहून नेटकरी भारावले  title=

दिग्गज माजी भारतीय फलंदाज आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.  गेल्या महिन्यात महाराजा ट्रॉफी KSCA T20 स्पर्धेत म्हैसूर वॉरियर्सने त्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला त्याने संघात  पदार्पण केले होते. पहिल्या दोन सामन्यात तो अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. दोन्ही सामन्यात तो एकल अंकी धावसंखेवर बाद झाला होता. पण अखेर  समितने बंगळुरू  ब्लास्टर्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त षटकार ठोकत चाहत्यांना प्रभावित केलं आहे.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना समितने माफक कामगिरी करत संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये केवळ सात धावांचे योगदान दिले. पण सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि समितच्या संघाने चार धावांनी  हा सामना गमावला.

समितकडे  एक आश्वासक युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. 2023-2024 कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याच्या कामगिरीने सर्वांचं  लक्ष वेधून घेतले. मधल्या फळीत फलंदाजी करत, त्याने आठ सामन्यांमध्ये 362 धावा करत कर्नाटकच्या विजेतेपदाच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

जम्मू आणि काश्मीर विरुद्ध 98 धावांची जबरदस्त  खेळी त्याने  केली. यातून  त्याचे फलंदाजीचे कौशल्य दिसून आले. या व्यतिरिक्त, समितने गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत आपण अष्टपैलू  खेळाडू असल्याचे दाखवून दिले. त्याने बॉलसह महत्त्वपूर्ण योगदान दिले, आणि  स्पर्धेत 16 विकेट्स मिळवल्या, ज्यामध्ये मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोन विकेट्सचा महत्त्वपूर्ण समावेश होता.

समितकडे आपले वडील राहुल द्रविड याच्यासारखा संयम दिसून येतो. समित मैदानात खेळत असताना त्यांच्यातील संयम आणि कौशल्य दिसून येते. एक यशस्वी आणि महान खेळाडू असणाऱ्या राहुल द्रविडनेच आपल्या मुलाला प्रशिक्षण दिलं आहे.

भारताचा  मुख्य प्रशिक्षक म्हणून व्यस्त वेळापत्रक असतानाही  द्रविड समितच्या क्रिकेट प्रवासात सक्रियपणे सामील होता. 2016 मध्ये अंडर १४ स्तरावर फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलविरुद्ध समितच्या 125 धावांच्या खेळीसारख्या उल्लेखनीय कामगिरीचा यात समावेश आहे.

दरम्यान, द्रविड  20212024 पर्यंत टीम इंडियाचा  मुख्य प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर विश्रांतीवर आहे. टी२० विश्वचषक जिकल्यानंतर त्याचा कार्यकाळ संपला.  द्रविडच्या नेतृत्वाखाली, भारताने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.