INDvsAUS: भारतीय टीमचा वनडे क्रिकेटमधला ५००वा विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी रोमांचक विजय झाला.

Updated: Mar 6, 2019, 01:55 PM IST
INDvsAUS: भारतीय टीमचा वनडे क्रिकेटमधला ५००वा विजय title=

नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी रोमांचक विजय झाला. यामुळे भारतानं ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमधला भारताचा हा ५००वा विजय होता. वनडेमध्ये ५०० विजय मिळवणारा भारत हा दुसरा देश बनला आहे. वनडेमध्ये सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत ९२४ मॅचमध्ये ५५८ विजय मिळवले आहेत, तर ३२३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. या यादीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं ९६३ मॅचमध्ये ५०० विजय मिळवले तर ४१४ मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. 

वनडेमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टीम 

टीम मॅच विजय पराभव
ऑस्ट्रेलिया ९२४ ५५८ ३२३
भारत ९६३ ५०० ४१४
पाकिस्तान ९०७ ४७९ ४०१
वेस्ट इंडिज ७९३ ३९० ३६५
श्रीलंका ८३२ ३७९ ४११
दक्षिण आफ्रिका ६०६ ३७४ २१०
इंग्लंड ७२६ ३६२ ३३०
न्यूझीलंड ७५८ ३४२ ३७०
झिम्बाब्वे ५१७ १३४ ३६५
बांगलादेश ३५८ ११८ २३३

भारतानं ठेवलेल्या २५१ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ४९.३ ओव्हरमध्ये २४२ रनवर ऑलआऊट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ रनची आवश्यकता होती. पण विजय शंकरनं पहिले धोकादायक मार्कस स्टॉयनिसची आणि मग ऍडम झम्पाची विकेट घेतली. मार्कस स्टॉयनिसनं ६५ बॉलमध्ये ५२ रन केले होते. याआधी बॅटिंग करतानाही विजय शंकरनं चमकदार कामगिरी केली होती. विराट वगळता इतर भारतीय बॅट्समनना अडचणी येत असताना विजय शंकरनं ४१ बॉलमध्ये ४६ रन केले होते.

भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि विजय शंकरला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि केदार जाधवला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसनं सर्वाधिक ५२ रन केले.

तत्पूर्वी या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताचा ४८.२ ओव्हरमध्ये २५० रनवर ऑलआऊट झाला. विराटचं वनडे कारकिर्दीमधलं हे ४०वं शतक होतं. विराट कोहलीनं १२० बॉलमध्ये ११६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोरचा समावेश होता.