INDvsAUS: धोनीची टीम इंडियाला पार्टी

भारताचा कॅप्टन विराट कोहलीने एक सेल्फी शेअर केला आहे. 

Updated: Mar 7, 2019, 06:54 PM IST
INDvsAUS: धोनीची टीम इंडियाला पार्टी title=

रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे झालेली दुसरी मॅच जिंकल्यानंतर तिसऱ्या मॅचसाठी भारतीय टीम रांचीमध्ये दाखल झाली आहे. रांची हे एमएस धोनीचं घर, यामुळे धोनीने भारतीय टीममधल्या त्याच्या सहकाऱ्यांना काल रात्री  (६ मार्च) आपल्या घरी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. यावेळेचे फोटो चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत ट्विटर हॅँडलवरुन ट्विट करण्यात आले आहेत. ट्विट केलेल्या फोटोमध्ये भारतीय टीमचे सर्व खेळाडू आणि इतर सहकारी दिसत आहे.  

धोनीच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले असताना भारताचा कॅप्टन   विराट कोहलीने एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये ऋषभ पंत, कुलदीप यादव, धोनी, युजवेंद्र चहाल पाहायला मिळत आहे. धोनीने त्याची पत्नी साक्षी सोबत भारतीय टीमचे आपल्या घरी स्वागत केले. सध्या भारतीय टीम चांगली कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. यामुळे भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. या सीरिजमधील तिसरी मॅच उद्या रांचीत होणार आहे. रांची धोनीचे होमग्राऊंड असल्याने धोनीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

याआधी रांचीतील मॅचसाठी एअरपोर्टवर दाखल झालेल्या टीम इंडियाने हॉटेलपर्यंतचा प्रवास बसनेच केला. पण धोनी केदार जाधव आणि ऋषभ पंत याला त्याच्या आवडत्या हमर गाडीने घेऊन गेला. त्यामुळे आपल्या शहरात आणि घरात धोनीने सहकाऱ्यांचा मनापासून पाहुणचार केला. 

ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या बहुतांश खेळाडूंनी बसनेच हॉटेल गाठले. पण धोनी, केदार जाधव आणि ऋषभ पंत यांनी धोनीच्या गाडीतून प्रवासाचा आनंद घेतला. या गाडीतून धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी कामगिरी केलेल्या केदार जाधव याला तसेच ऋषभ पंतला गाडीची सफर घडवली. या प्रवासाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

आतापर्यंत धोनीने रांचीच्या या मैदानात तीन मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी एका मॅचमध्ये विजय तर पराभव झाला आहे. तर एक मॅच होऊ शकली नाही. धोनीने या मैदानावर झालेल्या दोन्ही मॅचमध्ये मिळवून केवळ २१ रनच केल्या आहेत.