VIDEO: तिसऱ्या वनडेआधी भारतीय खेळाडूंची 'सिक्स'चा सराव

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Updated: Mar 7, 2019, 06:51 PM IST
VIDEO: तिसऱ्या वनडेआधी भारतीय खेळाडूंची 'सिक्स'चा सराव title=

रांची : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी वनडे शुक्रवार ८ मार्चला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे. ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं आधीच २-०ची आघाडी घेतली आहे. यामुळे तिसरी वनडे जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. रांची हे एमएस धोनीचं घरचं मैदान. यामुळे या मॅचला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे.

तिसऱ्या वनडेमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमनी जोरदार सराव केला. भारतीय क्रिकेटपटूंनी सिक्स मारण्याचा अभ्यास केला. बीसीसीआयनं त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. बीसीसीआयच्या या व्हिडिओमध्ये धोनी, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल सिक्स मारताना दिसत आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे या चौघांनाही रांचीच्या मैदानात अजून एकही सिक्स मारता आलेली नाही.

रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचं रेकॉर्ड श्रीलंकेच्या एंजलो मॅथ्यूजच्या नावावर आहे. मॅथ्यूजनं २०१४ साली भारताविरुद्ध १३९ रनची खेळी केली होती. यामध्ये १० सिक्सचा समावेश होता. विराट कोहली या यादीमध्ये ६ सिक्ससोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि जॉर्ज बेली यांनी या मैदानावर प्रत्येकी ३-३ सिक्स मारले आहेत. तर अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, मिचेल जॉनसन, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी आणि श्रीलंकेचा लेहरु थिरमाने यांनी या मैदानात प्रत्येकी एक-एक सिक्स मारली आहे.

घरच्या मैदानामध्ये धोनीचा हा शेवटचा सामना ठरू शकतो. वर्ल्ड कपनंतर धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत रांचीच्या मैदानात धोनी ३ आंतरराष्ट्रीय मॅच खेळला आहे. यातल्या २ मॅचमध्ये धोनीला बॅटिंगची संधी मिळाली. २०१३ साली इंग्लंडविरुद्ध धोनी १० रनवर नाबाद राहिला. २०१३ सालीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली. तर २०१६ साली न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये धोनी ११ रनवर आऊट झाला. या मैदानात खेळलेल्या २ मॅचमध्ये धोनीला २१ रनच करता आल्या.