मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली पहिली वनडे मॅच गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माला सचिनच्या रेकॉर्डच्या आणखी जवळ पोहोचण्याची संधी आहे. रोहित शर्माने वनडे कारकिर्दीत २१५ मॅचमध्ये २७ शतकं केली आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर आहे. ४९ शतकांसह सचिन पहिल्या क्रमांकावर आहे. पण शतकांबद्दलचं सचिनचं आणखी एक रेकॉर्ड रोहितला खुणावतो आहे.
वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. १९९८ साली सचिनने ९ शतकं केली होती. सचिनचं हे रेकॉर्ड मोडण्यासाठी रोहितला या वर्षात आणखी ४ शतकांची गरज आहे.
वॉर्नर आणि गांगुली हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. वॉर्नर आणि गांगुलीने एका वर्षात ७-७ शतकं केली. वेस्ट इंडिजविरुद्ध रोहितने एक शतक लगावलं तर तो वॉर्नर आणि गांगुलीची बरोबरी करु शकतो.
खेळाडू शतकं वर्ष
सचिन तेंडुलकर ९ १९९८
डेव्हिड वॉर्नर ७ २०१६
सौरव गांगुली ७ २०००
विराट कोहली ६ २०१८
रोहित शर्मा ६ २०१७
रोहित शर्मा ६ २०१९
विराट कोहली ६ २०१७
गॅरी कर्स्टन ६ १९९६
सचिन तेंडुलकर ६ १९९६
राहुल द्रविड ६ १९९९
सर्वाधिक शतकं करणाऱ्या टॉप-५ खेळाडूंच्या यादीत येण्यासाठी रोहितला एका शतकाची गरज आहे. या यादीत सचिन तेंडुलकर (४९ शतकं), विराट कोहली (४१ शतकं), रिकी पाँटिंग (३० शतकं) आणि सनथ जयसूर्या (२८ शतकं) या खेळा़डूंचा समावेश आहे. तर हाशिम आमला आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी २७-२७ शतकं केली आहेत. अमलाने १८१ मॅचमध्ये २७ शतक केली आहेत, तर रोहितला एवढी शतकं करण्यासाठी २१५ मॅच लागल्या.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं करण्याचा विक्रम रोहितच्याच नावावर आहे. रोहितने वनडेमध्ये ३ द्विशतकं लगावली आहेत. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, मार्टिन गप्टील, क्रिस गेल आणि फखर जमां यांनी वनडेमध्ये प्रत्येकी एक द्विशतक केलं आहे.