कोल्हापूर : जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर याचे उपचारदरम्यान निधन झाले. कुस्ती खेळताना मानेला गंभीर दुखापत झाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.कराडच्या कृष्णा रुगणालयात उपचार सुरु होते.
शाहूवाडी तालुक्यातील बांदवडे येथे कुस्ती खेळताना मल्ल नीलेश गंभीर जखमी झाला होता. त्यांनतर त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबईला हलविण्यात येत होते. वाटेतच त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
येथील ज्योतिबा यात्रेनिमित्ताने १ एप्रिलला कुस्ती स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या मैदानात २० वर्षीय पैलवान नीलेश उतरला होता. कुस्ती खेळताना प्रतिस्पर्धी पैलवानाने नीलेशला आपल्या कवेत धरत उचलून जमिनीवर आपटले. या डावात नीलेश डोक्यावर आपटला गेला. त्यानंतर तो त्याच स्थितीत होता. तात्काळ त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले होते.
दरम्यान, नीलेशच्या घरी कुस्तीची परंपरा आहे. त्याच्या घरात आजोबा, वडील पै. विठ्ठल कंदूरकर, वडिलांचे मामा वस्ताद दिवंगत सावळा गवड हे नामांकित पैलवान होते. त्यामुळे मुलगाही पैलवान व्हावा अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा नीलेशच्या माध्यमातून पूर्णाकडे जात असताना नीलेशच्या अचनाक जाण्याने अधुरीच राहिलेय.