मुंबई : भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (Indian Olympic Association) अध्यक्ष नरिंदर बत्रा (Narinder Batra) यांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे संकेत दिले आहेत. 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी (International Olympic Committee) बोलणं सुरु असल्याचं नरिंदर बत्रा यांनी म्हटलं आहे. भारताला आयोजनाची संधी मिळाली तरी अहमदाबादमधील (Ahmadabad) मोटेरा स्टेडिअम (Narendra Modi Stadium at Motera) हे उद्घाटन सोहळ्याचं सर्वोत्तम ठिकाण असेल असंही बत्रा यांनी म्हटलं आहे.
भारतात ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या (Opening Ceremony) आयोजनासाठी मोटेरापेक्षा दुसरं मोठं आणि उत्तम स्टेडिअम नाही. 2036 पर्यंत काय होईल हे आताच सांगता येणार नाही, पण सध्य परिस्थितीत अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअमचं नाव मी निश्चित प्रस्तावित करेन असं बत्रा यांनी म्हटलं आहे. डिसेंबरमध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) निवडणुकीनंतर नवे अध्यक्ष ऑलिम्पक आयोजनाच्या बोलीसाठी उचित प्रस्ताव तयार करतील, अशी माहितीही बत्रा यांनी दिली आहे. 2036 ऑलिम्पिक आयोजनासाठी सहा-सात देशांमध्ये भारतही एक प्रबळ दावेदार आहे.
2036 ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची भारताला सर्वाधिक संधी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी (IOC) यासंदर्भात सातत्याने बोलणी सुरु असून येत्या दोन-तीन वर्षात याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहितीही नरेंद्र बत्रा यांनी दिली आहे.