close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

IPL 2019: दोन मॅचमधल्या दोन चुकांमुळे मुंबईचा विजय?

कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला.

Updated: Apr 11, 2019, 04:23 PM IST
IPL 2019: दोन मॅचमधल्या दोन चुकांमुळे मुंबईचा विजय?

मुंबई : कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला. पोलार्डने ३१ बॉलमध्ये ८३ रनची खेळी केली. यामध्ये १० सिक्स आणि ३ फोरचा समावेश होता. मुंबईला विजयासाठी शेवटच्या बॉलला २ रनची गरज होती. तेव्हा अल्जारी जोसेफने २ रन काढून मुंबईला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

मुंबईने या मॅचमध्ये विजय मिळवून दिला असला तरी या मॅचवेळी वाद पाहायला मिळाला. १३व्या ओव्हरला हार्डस विलजोएनने हार्दिक पांड्याला टाकलेला बॉल लेग स्टम्पला लागला. स्टम्पला बॉल लागल्यानंतरही बेल्स पडली नाही आणि बॉल फोरच्या दिशेनं गेला. बॉल स्टम्पला लागलेला असतानाही अंपायरने वाईड बॉल दिला. यामुळे मुंबईला वाईडची एक रन आणि फोरच्या चार रन अशा एकूण पाच रन मिळाल्या. एवढच नाही तर पंजाबच्या टीमला एक बॉल जास्तही टाकावा लागला.

अंपायरने हा वाईड बॉल दिला नसता तर मुंबईला एक रन कमी मिळाली असती, तसंच एक बॉल कमी खेळायला मिळाला असता. अशा परिस्थितीमध्ये मॅचचा निकाल कदाचित वेगळा लागला असता.

अंपायरच्या चुकीमुळे मुंबईच्या विजयाला हातभार लागल्याची या मोसमातली ही दुसरी वेळ आहे. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर लसिथ मलिंगाने नो बॉल टाकला होता. अंपायरने मात्र हा नो बॉल दिला नाही. या मॅचमध्ये बंगळुरूचा ६ रननी पराभव झाला होता. अंपायरने त्यावेळीही नो बॉल दिला असता तर मॅचचं चित्र पालटलं असतं. या चुकीमुळे बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली चांगलाच भडकला होता. आपण क्लब क्रिकेट नाही तर आयपीएल खेळत आहोत. अंपायरने डोळे उघडे ठेवले पाहिजेत, अशी टीका विराटने केली होती.

पंजाबविरुद्धच्या विजयामुळे मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. तर पंजाबची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईने आत्तापर्यंत खेळलेल्या ६ मॅचपैकी ४ मॅचमध्ये विजय मिळवला तर २ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.