IPL 2019: चेन्नईचा कोलकात्यात तब्बल ५ वर्षांनी विजय

चेन्नई अंकतालिकेत १४ पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे.

Updated: Apr 14, 2019, 11:04 PM IST
IPL 2019: चेन्नईचा कोलकात्यात तब्बल ५ वर्षांनी विजय title=

कोलकाता : चेन्नईने कोलकात्याचा ५ विकेटने पराभव केला आहे. कोलकात्याचा हा लागोपाठ तिसरा पराभव आहे. चेन्नईने तब्बल ५ वर्षानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात मॅच जिंकली आहे. चेन्नईने या मैदानात शेवटची मॅच २०१३ साली जिंकली होती. 

या मॅचमध्ये चेन्नईने टॉस जिंकून कोलकात्याला बॅटिंगला बोलावले. कोलकात्याने २० ओव्हरमध्ये ८ विकेटच्या मोबदल्यात १६१ रन केल्या. कोलकात्याकडून सर्वाधिक ८२ रन क्रिस लिनने केल्या. लिनच्या ८२ रनच्या जोरावर कोलकाताने चेन्नईला विजयासाठी १६२ रनचे आव्हान दिले. चेन्नईकडून इमरान ताहिरने सर्वाधिक ४ विकेट मिळवल्या. तर शार्दूल ठाकूरने २ आणि मिचेल सॅटनरने १ विकेट घेतली. ताहिरच्या फिरकीपुढे कोलकाताच्या कोणत्याच बॅट्समनला जास्त वेळ मैदानात टिकता आले नाही.

कोलकाताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची अडखळत सुरुवात झाली. चेन्नईचा विकेट सातत्याने जात होत्या. पण सुरेश रैना आणि रविंद्र जडेजाच्या जोडीने चेन्नईच्या डावाला स्थिरता दिली आणि विजय देखील मिळवून दिला. या दोघांमध्ये नाबाद ४१ रनची विजयी भागीदारी झाली. सुरेश रैनाने सर्वाधिक नाबाद ५८ रनची निर्णायक खेळी केली. तर रविंद्र जडेजाने देखील नाबाद ३१ रन करत रैनाला चांगली साथ दिली. चेन्नईने विजयी आकडा २ बॉल आणि ५ विकेट ठेवून गाठला. 

चेन्नईने आतापर्यंत आयपीएलच्या या मौसमात खेळलेल्या एकूण ८ मॅचपैकी ७ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई विरुद्ध झालेल्या चौथ्या मॅचचा अपवाद वगळता चेन्नईने सर्व मॅच जिंकल्यात. चेन्नई अंकतालिकेत १४ पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर पराभवानंतर देखील कोलकाता टीम चांगल्या रनरेटमुळे दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. 

चेन्नईकडून सर्वाधिक ४ विकेट घेतलेल्या इमरान ताहिरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. त्याने क्रिस लिन, नितीश राणा, रॉबिन उथप्पा आणि विस्फोटक खेळी करणाऱ्या आंद्रे रसेलची विकेट घेतली.