विशाखापट्टणम : आयपीएलच्या एलिमिनेटर मॅचमध्ये दिल्लीने हैदराबादचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. हैदराबादने ठेवलेल्या १६३ रनचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या पराभवामुळे हैदराबाद या स्पर्धेतून बाद झाली आहे. तर दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईशी होणार आहे. दिल्ली आणि चेन्नई यांच्यातली ज्या टीमचा विजय होईल, ती टीम फायनलमध्ये मुंबईशी खेळेल.
दिल्ली आणि हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या या मॅचच्या टॉसवेळी गोंधळ पाहायला मिळाला. या मॅचच्या टॉससाठी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर, हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर, मॅच रेफ्री मैदानात आले. पण संजय मांजरेकर यांची कॉमेंट्री सुरु असतानाच श्रेयस अय्यरने नाणं उडवलं. संजय मांजरेकर यांनी अय्यरला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अय्यरने आधीच नाण हवेत फेकलं होतं. संजय मांजरेकर, केन विलियमसन आणि श्रेयस अय्यर यांनी हवेतच नाणं हातात पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर श्रेयस अय्यरच्या हातात हे नाणं आलं.
Skipper Iyer eager to get things started here in Vizag pic.twitter.com/2EwJGEuFLh
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2019
टॉसच्या आधी कॉमेंटेटर दोन्ही अंपायरची आणि मॅच रेफ्रीची ओळख करून देतो आणि मग नाणं उडवलं जातं. हे सगळं झालेलं नसतानाच श्रेयस अय्यरने घाई केली. अखेर पुन्हा एकदा श्रेयस अय्यरने टॉस उडवला. श्रेयस अय्यरने हा टॉस जिंकला आणि पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.