IPL 2019: चेन्नईवर मुंबई पुन्हा भारी, 'रोहित'सेनेची फायनलमध्ये धडक

आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईने चेन्नईचा ६ विकेटने पराभव केला आहे.

Updated: May 7, 2019, 11:22 PM IST
IPL 2019: चेन्नईवर मुंबई पुन्हा भारी, 'रोहित'सेनेची फायनलमध्ये धडक title=

चेन्नई : आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईने चेन्नईचा ६ विकेटने पराभव केला आहे. याबरोबरच मुंबईची टीम आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. चेन्नईने ठेवलेल्या १३२ रनचा पाठलाग मुंबईने १८.३ ओव्हरमध्ये केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५४ बॉलमध्ये नाबाद ७१ रन केले. 

चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सुरुवातीलाच दोन धक्के लागले. पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला कर्णधार रोहित शर्मा ४ रनवर आऊट झाला. यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला क्विंटन डिकॉक ८ रनवर माघारी परतला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने मुंबईचा डाव सावरला. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यामध्ये ८० रनची पार्टनरशीप झाली. ३१ बॉलमध्ये २८ रन करून आऊट झाला. इम्रान ताहिर याने इशान किशनला माघारी पाठवल्यानंतर लगेच पुढच्या बॉलला त्याने कृणाल पांड्याची विकेट घेतली. सूर्यकुमार यादवबरोबर हार्दिक पांड्या १३ रनवर नाबाद राहिला. 

चेन्नईकडून इम्रान ताहिरने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर दीपक चहर आणि हरभजन सिंगला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. 

या मॅचमध्ये धोनीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पण मुंबईच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच चेन्नईला धक्के दिले. चेन्नईची अवस्था ३२-३ आणि ६५-४ अशी झाली होती. पण यानंतर धोनी आणि रायुडूने चेन्नईचा डाव सावरला. अंबाती रायुडने ३७ बॉलमध्ये सर्वाधिक नाबाद ४२ रन केले, तर धोनीने २९ बॉलमध्ये नाबाद ३७ रनची खेळी केली.

मुंबईकडून राहुल चहरने सर्वोत्तम कामगिरी केली. चहरने ४ ओव्हरमध्ये १४ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर कृणाल पांड्या आणि जयंत यादवला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

१२ मे रोजी फायनलमध्ये मुंबईचा सामना क्वालिफायर-२ जिंकणाऱ्या टीमशी होईल. उद्या म्हणजे ८ मेरोजी आयपीएलच्या एलिमिनेटरचा सामना हैदराबाद आणि दिल्लीमध्ये रंगेल. या मॅचमध्ये ज्यांचा विजय होईल ती टीम १० मे रोजी चेन्नईशी क्वालिफायर-२चा सामना खेळेल. क्वालिफायर-२ मध्ये विजय मिळवलेली टीम फायनलमध्ये मुंबईशी भिडेल.