close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO: हार्दिक पांड्याशी पंगा पंजाबच्या बॉलरला महागात

पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३ विकटने रोमहर्षक विजय झाला.

Updated: Apr 11, 2019, 05:37 PM IST
VIDEO: हार्दिक पांड्याशी पंगा पंजाबच्या बॉलरला महागात
फोटो सौजन्य : आयपीएल स्क्रीन शॉट

मुंबई : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३ विकटने रोमहर्षक विजय झाला. कायरन पोलार्ड हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पोलार्डने ३१ बॉलमध्ये ८३ रनची वादळी खेळी केली. पण शेवटच्या ओव्हरला मोक्याच्या क्षणी तो आऊट झाला. मुंबईला शेवटच्या बॉलवर विजयासाठी २ रनची गरज होती. तेव्हा अल्झारी जोसेफने दोन रन काढून मुंबईला जिंकवलं.

मुंबई आणि पंजाबच्या या मॅचमध्ये काही तणावाचे क्षणही पाहायला मिळाले. मुंबईच्या बॅटिंगवेळी हार्दिक पांड्या आणि पंजाबचा फास्ट बॉलर हार्डस विलियन एकमेकांशी भिडताना पाहायला मिळाले. १२व्या आणि १३व्या ओव्हरदरम्यान मैदानात हा प्रकार घडला. ईशान किशन आऊट झाल्यानंतर हार्दिक पांड्या बॅटिंगसाठी आला होता. १२व्या ओव्हरमध्ये मुंबईचा स्कोअर ९४/४ असा होता. मुंबईला विजयासाठी ४८ बॉलमध्ये १०४ रनची गरज होती. मुंबईची भिस्त पोलार्ड आणि हार्दिक पांड्यावर अवलंबून होती.

पंजाबचा कर्णधार अश्विनने १३वी ओव्हर हार्डस विलियनला दिली. विलियन अंपायरकडे त्याची टोपी द्यायला गेला तेव्हा त्याचा सामना हार्दिक पांड्याशी झाला. विलियन हार्दिक जवळ थांबला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागला. या दोघांमध्ये कोणतीच बातचित झाली नाही. अखेर विलियन हसला आणि त्याने अंपायरकडे टोपी दिली. यानंतर हार्दिकही क्रिजमध्ये गेला.

हार्दिकशी पंगा घेतल्यानंतर याच ओव्हरमध्ये विलियनने १५ रन दिले. पहिल्याच बॉलला विलियनने टाकलेला बॉल हार्दिक पांड्याच्या स्टम्पला लागला, पण बेल्स पडली नाही. विलियनचा हा बॉल सीमारेषेबाहेर गेला. यावेळी अंपायरनेही चूक करत वाईड बॉल दिला. यामुळे मुंबईला ५ रन मिळाले. या ओव्हरला १५ रन आल्यामुळे मुंबईला विजयासाठी ४२ बॉलमध्ये ८९ रनची गरज होती.

हार्दिक पांड्याला या मॅचमध्ये मोठी खेळी करता आली नाही. १३ बॉलमध्ये १९ रन करून हार्दिक आऊट झाला. पण पोलार्डनं शेवटपर्यंत किल्ला लढवला.

हार्दिकची धुलाई

पंजाबच्या बॅट्समननी हार्दिक पांड्याच्या बॉलिंगची चांगलीच धुलाई केली. हार्दिक पांड्याने ४ ओव्हरमध्ये तब्बल ५७ रन देऊन २ विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने टाकलेल्या १९व्या ओव्हरमध्ये २५ रन आले. केएल राहुलने या ओव्हरमध्ये हार्दिकला ३ सिक्स आणि १ फोर मारून २३ रन काढले, तर मंदीप सिंगने या ओव्हरमध्ये २ रन केले.

केएल राहुलने केलेल्या या धुलाईनंतर सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला ट्रोलही करण्यात आलं. कॉफी विथ करण शोमध्ये झालेल्या वादाचा बदला केएल राहुलने घेतल्याची मजेशीर ट्विट क्रिकेट फॅन्सनी केली.