नवी दिल्ली : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने रोहीत शर्माच्या मुंबई इंडीयन्सला सूपरओव्हरमध्ये मात दिली. यावर बॉलीवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिलीय. तिची प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे. विराटच्या खेळण्यावरुन माजी क्रिकेटपट्टू सुनील गावस्कर यांच्या विधानानंतर अनुष्काने त्यांना प्रश्न विचारला होता. त्यानंतर विराटच्या टीमचा हा पहीलाच विजय आहे. अटीतटीच्या झालेला हा सामना सूपर ओव्हरपर्यंत गेला. आणि सूपर ओव्हरमध्ये विराटच्या टीमने बाजी मारली.
या विजयानंतर अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली. एका गर्भवती महिलेसाठी हे खूपच रोमांचकारी आहे. यासोबतच तिने बदामाची इमोजी शेअर केली. अनुष्काचा मेसेज सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतोय आणि फॅन्सच्या पसंतीस पडतोय.
या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या 'विराट'सेनेनं २० षटकांमध्ये ३ गडी बाद २०१ धावा केल्या.
बंगळुरुनं दिलेलं हे लक्ष्य स्वीकारत मुंबईनं काहीशी संथ सुरुवात करत अखेरच्या काही षटकांमध्ये वेगवान खेळी केली. ज्यामध्ये ४ गडी गमावत संघानं २०१ धावा केल्या. बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात करत मुंबईच्या संघाला काहीसं मागे टाकण्याचा प्रयत्न केला. किंबहुना बंगळुरूच्या गोलंदाजांना यात यशही आलं. पण, चौथा खेळाडू तंबूत परतल्यानंतरही मुंबईच्या खेळाडूंची जिद्द संपली नाहीय पाचव्या स्थानावर आलेल्या कायरन पोलार्डनं ईशान किशनच्या साथीनं मैदानात चौफेर फटकेबाजीनं खऱ्या अर्थानं मुंबईला या सामन्यात तग धरुन ठेवण्यास मदत केली.
चौकार आणि षटकारांची बरसात करत पाहता पाहता किशन आणि पोलार्डनं मुंबईच्या संघावरचं सामन्यावरील पकड सुटण्याचं ओझं हलकं केलं. शतकापासून अवघी एक धाव मागे असतानाच इशान किशननं आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा हा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. ९९ वेगवान धावांचा डोंगर रचून आणि विराट सेनेला घाम फोडून किशन परतला. तर, इथं शेवटच्या चेंडूवर चौकार मारत पोलार्डनं हा सामना सुपओव्हरमध्ये नेऊन ठेवला.
बंगळुरू- मुंबई हा सामना सुरु होण्यापूर्वी जी उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळाली होती ती सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत सार्थ ठरली. सुपर ओव्रहसाठी मुंबईकडून पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानात आले. तर, बंगळुरूकडून हे षटक टाकण्याची जबाबदारी नवदीप सैनीला देण्यात आली. पहिल्या तिन्ही चेंडूंमध्ये मोठे फटके मारण्यात मुंबईच्या दोन्ही खेळाडूंना यश आलं नाही. चौकाराची भर टाकल्यानंतर याच षटकातील पाचव्या चेंडूवर पोलार्ड झेलबाद झाला. तर, अखेरच्या चेंडूवर हार्दिकलाही दमदार फटका मारता आला नाही. तगडं आव्हान देण्याचा मनसुबा असणाऱ्या मुंबईच्या संघानं सुपरओव्हरमध्ये अवघ्या ७ धावा केल्या.