IPL 2020 : चेन्नईच्या दिग्गज खेळाडूंना दिल्लीचे युवा खेळाडू देणार टक्कर

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल मध्ये रंगणार सामना

Updated: Sep 25, 2020, 02:09 PM IST
IPL 2020 : चेन्नईच्या दिग्गज खेळाडूंना दिल्लीचे युवा खेळाडू देणार टक्कर title=

दुबई : आयपीएल 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतर दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाचा सामना करावा लागलेल्या चेन्नई संघाला आज पुन्हा एकदा विजयांची आशा आहे. तर दुसरीकडे दिल्लीसाठी हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात दिल्लीने पंजाबविरुद्ध विजय मिळविला असता तर संघाचा आत्मविश्वास वाढला असता. एकीकडे दिल्लीकडे युवा खेळाडूंचा उत्साह असेल तर दुसरीकडे चेन्नईकडे अनुभवी खेळाडूंची फौज. त्यामुळे आज चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

चेन्नई संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या फिरकी गोलंदाजांची खराब कामगिरी आणि 20 व्या ओव्हरमध्ये निराशाजनक कामगिरी यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. त्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने सॅम कुरेन, जाधव आणि रुतूराज गायकवाडला आधी फलंदाजीसाठी पाठवले. पण ही रणनीती चुकली. त्यामुळे फाफ डू प्लेसिसवर कमी कालावधीत बरेच धावा काढण्याचा दबाव वाढला. अशा परिस्थितीत हा अनुभवी खेळाडू दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतो आणि यावेळी चाहत्यांना देखील या खेळाडूंकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

याशिवाय मागील सामन्यात धोनीच्या संघातील फिरकीपटूंनी खराब कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत धोनी पीयूष चावलाच्या जागी करण शर्माला संघात स्थान देऊ शकतो.

दिल्ली संघात पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत, कॅप्टन श्रेयस अय्यर आणि शेवटच्या सामन्याचा नायक मार्कस स्टोइनिस सारखे मोठे हिटर आहेत. पण खांद्याच्या दुखापतीमुळे रविचंद्रन अश्विनच्या खेळण्यावर शंका आहे. अशा परिस्थितीत दिल्लीला त्यांच्या गोलंदाजांमध्ये काही बदल करावे लागतील. अश्विन जर खेळत नसेल तर अमित मिश्रासह अक्षर पटेलला साथ देण्यासाठी पर्याय असू शकतो.

संघाचा फिल्डींग कोच मोहम्मद कैफ म्हणाला की, 'आजच्या सराव सत्रानंतर आम्ही अश्विनबाबत निर्णय घेऊ. तो सरावासाठी येत आहे. आमचा फिजिओ पॅट्रिक फरहार्ट निर्णय घेईल. अमित मिश्रासारखा गोलंदाज त्याची जागा भरुन काढू शकतो. ही चांगली गोष्ट आहे.'

चेन्नई सुपर किंग्ज: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायडू, फाफ डु प्लेसी, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी अँगिडी, दीपक चहर, पियुष चावला, इम्रान ताहिर, मिशेल सेंटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, सॅम करीन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतूराज गायकवाड, कर्ण शर्मा.

दिल्ली कॅपिटल : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमीयर, कॅगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिचाने, कीमो पॉल, डॅनियल सॅम, मोहित शर्मा, एनरिच नॉर्जे, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोईनिस, ललित यादव.