IPL 2021 : RCBचा दारुण पराभव, पण कोहली KKRच्या 'या' बॉलर्सच्या कामगिरीवर खूश

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर बंगलोरच्या संघाने शरणागती पत्करली  

Updated: Sep 21, 2021, 03:26 PM IST
IPL 2021 : RCBचा दारुण पराभव, पण कोहली KKRच्या 'या' बॉलर्सच्या कामगिरीवर खूश

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (RCB) आपल्या पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांसमोर बंगलोरच्या संघाने अवघ्या 92 धावात शरणागती पत्करली. कोलकाताच्या या विजयाचा हिरो होता मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy). 

वरुण चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीने आरसीबीला बॅकफूटवर ढकललं. यानंतर बंगलोरला सामन्यात परतताच आलं नाही. वरुण चक्रवर्तीने चार ओव्हरमध्ये केवळ 13 धावा देत बंगलोरच्या 3 फलंदाजांना माघारी धाडलं. वरुणच्या या शानदर कामगिरीमुळे तो सामन्याचा मानकरी ठरला.

बंगलोरचा पराभव झाला असला तरी कर्धणार विरोट कोहली मात्र कोलकाताचा बॉलर वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीवर खूश आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने वरुणचं कौतुक केलं. याचं कारण म्हणजे आगामी टी-20 विश्व चषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात वरुण चक्रवर्तीचा समावेश आहे. त्यामुळे आयपीएलमधली त्याची कामगिरी टी-20 विश्षचषक स्पर्धेत भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

विश्व चषक स्पर्धेत एक्स फॅक्टर

सामन्यानंतर विराट कोहलीने वरुणबद्दल बोलताना सांगितलं, वरुण जेव्हा भारतासाठी खेळेल तेव्हा तो एक एक्स फॅक्टर म्हणून समोर येईल. वरुण चक्रवर्ती सारखंच ज्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे, त्यांच्याकडूनही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाची बेंच स्ट्रेंथ नेहमीच मजबूत राहिल. 

वरुण चक्रवर्तीची दमदार कामगिरी

वरुण चक्रवर्तीने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 13 धावा देऊन 3 बळी घेतले. या दरम्यान त्याने 15 निर्धाव चेंडू टाकले. चक्रवर्तींनी ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि सचिन बेबी यांच्या विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीच्या मिस्ट्री स्पीन गोलंदाजीसमोर बंगलोरचे फलंदाज निष्प्रभ ठरले. गोलंदाजीबरोबरच वरुणने क्षेत्ररक्षणातही कमाल केली. सामन्यात त्याने एक शानदार झेल घेतला तसंच जेमीसनला धावबादही केलं.

सामनावीर घोषित झाल्यानंतर वरुण चक्रवर्ती म्हणाला, 'जेव्हा माझ्या हातात चेंडू असतो, तेव्हा मी खेळपट्टीचं बारकाईने निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आजची खेळपट्टी सपाट होती, खेळपट्टीला कोणतंही वळण नव्हतं. त्यामुळे स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यावर माझा भर होता. आणि हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला.

वयाच्या 26 व्या वर्षी आपण क्रिकेट खेळायला सुरुवात केली, खूप उशीरा सुरूवात झाल्याने आपण चांगली कामगिरी करु की नाही याबाबत शाश्वती नव्हती.  पण आता भारताकडून खेळायला मिळत असल्याने आपला आत्मविश्वास वाढला आहे, अशी प्रतिक्रिया वरुण चक्रवर्तीने दिली आहे.