चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या सीझनची सुरुवात मुंबई इंडीयन्स आणि रॅायल चॅलेन्जर्स बँगलोर यांनी केली. परंतु ती मॅच मुंबई इंडीयन्सने गमावली. त्यानंतर मुंबईने सलग तिन सामने जिंकले, परंतु हे 3 सामने जिंकणे शक्य झाले ते मुंबईच्या गोलंदाजामुळे, कारण मुंबईच्या फलंदाजांनी हवी तशी चांगली फलंदाजी केली नाही. परंतु आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी विरोधी संघाला रोखून ठेवले.
या गोष्टीमुळेच मुंबई इंडीयन्सचे चाहते सध्या मुंबईच्या फलंदाजांच्या खेळावर नाखूश आहेत. अशातच मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या टीमच्या मिडल ऑर्डरच्या फ्लॉप शोबद्दल आपले वक्तव्य दिले. त्याच्या मते, हा फक्त एका मॅचचा प्रश्न आहे आणि त्याची टीम पुन्हा पुढच्या मॅचला फॉर्मात परत येईल.
मुंबई इंडियन्सच्या मिडल ऑर्डरमध्ये ईशान किशन (Ishan Kishan), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) सारखे खेळाडू आहेत. परंतु आयपीएल 2021 मध्ये ते आपला चांगला खेळ दाखवू शकले नाहीत.
शुक्रवारी कर्णधार रोहित शर्माने पंजाब किंग्ज विरूद्ध 63 धावा करुन चांगला स्कोर करायला मदत केली. परंतु मिडल ऑर्डर पुन्हा अपयशी ठरली आणि संघ 6 विकेट्सवर 131 धावाच करू शकला. त्यामुळे पंजाबने 9 विकेटने या सामन्यात आपला सहज विजय नोंदविला.
सामन्यानंतर प्रेस कॅान्फरन्समध्ये सूर्यकुमार यादव म्हणाला की, "मिडल ऑर्डरमधील फलंदाजांच्या कामगिरीबद्दल संघाला चिंता नाही. ते नेटमध्ये, दररोज मेहनत घेत आहे. हा फक्त एका सामन्याचा प्रश्न आहे."
सूर्यकुमार यादव म्हणाला, "प्रत्येक खेळाडू प्रत्येक सामन्यात जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत असतो, फक्त त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत आणि हे प्रत्येक खेळात घडत असते. मला खात्री आहे की, आम्ही पुन्हा सामन्यात परत येवू."
पंजाब किंग्ज विरुद्ध 27 चेंडूंत 33 धावा करणारा सूर्यकुमार यादव म्हणाला, "मैच दरम्यान काही गोष्टी वेगळ्या प्रकारे घडतात. पण सराव करताना आम्ही अशा विकेटवर खेळण्याचा प्रयत्न करत आहोत."
सूर्यकुमार यादव म्हणाला,"आम्ही यापूर्वीही अशा प्रकारच्या परिस्थितींचा सामना केला आहे आणि जोरदार पुनरागमन देखील केले आहे. त्यामुळे मला वाटते की, आम्ही जोरदार पुनरागमन करू. आम्ही सामन्यात आमचा जबरदस्त खेळ दाखवू आणि मागे वळून पाहणार नाही."