IPL 2022 : CSK करणार धोनीला रिटेन, तर हा खेळाडू होणार लखनौ या नव्या संघाचा कर्णधार

IPL 2022 साठी प्रत्येक संघाला 4 खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्य़ा संघात कोणते खेळाडू कायम राहणार पाहा...

Updated: Nov 25, 2021, 06:52 PM IST
IPL 2022 : CSK करणार धोनीला रिटेन, तर हा खेळाडू होणार लखनौ या नव्या संघाचा कर्णधार title=

IPL 2022 : आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक संघाला 4 खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी मिळेल आणि चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीला (Dhoni) कायम ठेवू शकते, तर दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतसह इतर खेळाडूंना कायम ठेवण्याची तयारी करत आहे.

चेन्नई सुपर किंग्जची रणनीती

एका मीडिया रिपोर्टनुसार, CSK ने आगामी IPL मोसमासाठी एमएस धोनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने धोनीसह ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा (Jadeja) आणि मोईन अली यांनाही कायम ठेवले आहे. मोईन अलीच्या जागी सॅम कुरनच्या नावाचाही समावेश होऊ शकतो.

दिल्ली कॅपिटल्सची योजना

दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपला स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो. अहवालानुसार, दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतसह पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि एनरिक नोर्किया यांना संघात ठेवू शकतो. दिल्ली श्रेयस अय्यरसह रविचंद्रन अश्विनला सोडण्याचा निर्णय घेऊ शकते. म्हणजेच पुढील सत्रात ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होऊ शकतो.

राहुल होणार लखनौचा कर्णधार?

आयपीएलच्या नियमांनुसार सर्व संघांना 4 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी होती. सर्व संघांनी आपली यादी 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करायची आहे. पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Auction) ही होणार आहे. या आयपीएल हंगामात 2 नवीन संघ (अहमदाबाद आणि लखनौ) मैदानात उतरतील.

लखनऊ संघ केएल राहुलला (KL Rahul) त्यांच्या संघाचा कर्णधार बनवू शकतो. वृत्तानुसार, चेन्नई सुरेश रैनाला सोडण्याचा निर्णय घेऊ शकते आणि तो नव्या संघासह मैदानात हजेरी लावू शकतो.

हार्दिक पांड्या होणार मुंबईबाहेर?

मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह, इशान किशनला कायम ठेवू शकतो. त्याचवेळी किरॉन पोलार्डसोबत मुंबई संघाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मेगा लिलावात सूर्यकुमार यादवला पुन्हा संघात स्थान मिळवून देण्याकडे मुंबईकरांचे लक्ष असेल. म्हणजेच हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांना मुंबई संघातून डिस्चार्ज मिळू शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स फिरकी अष्टपैलू सुनील नरेनसह आंद्रे रसेलला संघात कायम ठेवू शकतो. कोलकाता संघ व्यवस्थापन अद्याप व्यंकटेश अय्यरबद्दल पूर्णपणे तयार नाही.

आयपीएलमध्ये प्रवेश करणाऱ्या दोन नव्या संघांचीही आता अनेक खेळाडूंशी चर्चा सुरू आहे. केएल राहुल लखनौकडून खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर अधिकृत यादी आल्यानंतर दोन्ही संघांना खेळाडूंशी संवाद साधणे सोपे होणार आहे. चेन्नईत सुरेश रैनाच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही नव्या संघांना नक्कीच संधी मिळणार आहे. आयपीएलचा हंगाम भारतातच खेळवला जाईल, अशी माहिती खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.