मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता 26 मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर मुंबई संघाचा सामना असणार आहे. 5 वेळा जेतेपद मिळवल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई ट्रॉफी मिळवण्यासाठी कंबर कसणार आहे.
गेल्या वर्षी मुंबई संघाला ट्रॉफी मिळवण्यात यश आलं नाही. चेन्नई संघाने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मासाठी हा पहिलाच आयपीएलचा हंगाम असणार आहे. मुंबईचं कर्णधारपदही रोहितकडे आहे.
मुंबई संघाला पहिल्या सामन्याआधी एक मोठा दिलासा मिळाला. स्टार खेळाडू संघात परतला आहे. त्यामुळे टीमला मजबूती मिळाली आहे. हा खेळाडू ओपनिंग देखील करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 27 मार्च रोजी रोहितची टीम मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्लीसोबत होणार आहे.
क्विंटन डी कॉक रोहित शर्मासोबत ऑपनिंगसाठी उतरायचा मात्र आता तो मुंबई संघात नसल्याने इशान किशन रोहितसोबत ओपनिंग करू शकतो अशी चर्चा आहे. क्विंटन लखनऊ संघाकडून खेळताना दिसणार आहे.
इशान किशनला मुंबई संघाने 15.25 कोटी देऊन संघात समाविष्ट करून घेतलं आहे. सलामीवीर आणि विकेटकीपर म्हणून तो मुंबई संघातून खेळणार आहे. इशान किशन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो फलंदाजीसोबत विकेटकीपिंग करेल त्याचा फायदा मुंबईला होणार आहे.
2021च्या आयपीएलमध्ये इशान गेम चेंजर ठरला. त्याने हैदराबाद विरुद्ध 32 बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली. 11 चौकार आणि 4 षटकार ठोकून त्याने सर्वांनाच थक्क केलं. इशानच्या झंझावाती खेळीचा मुंबईला फायदा झाला खरा पण प्ले ऑफपर्यंत पोहोचता आलं नाही.
इशानची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी जर उत्तम राहिली तर त्याचा विचार टी 20 वर्ल्ड कपसाठीही केला जाऊ शकतो. इशानला टीम इंडियाकडून फलंदाजीसाठी संधी मिळाली मात्र पंतमुळे विकेटकीपिंगची संधी मिळाली नाही. मात्र आता सर्वांचं लक्ष आयपीएलमधील त्याच्या कामगिरीवर असणार आहे.