T20 World Cup: रोहित-राहुलचं T-20 करियर संपुष्टात? भारताला मिळाली Six ने सुरुवात करणारी सलामीवीरांची जोडी

rohit sharma kl rahul t20 career finish : रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांना यंदाच्या आयपीएलच्या पर्वात अद्याप दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच आता या दोघांना पुन्हा टी-20 संघात स्थान मिळेल का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 13, 2023, 12:39 PM IST
T20 World Cup: रोहित-राहुलचं T-20 करियर संपुष्टात? भारताला मिळाली Six ने सुरुवात करणारी सलामीवीरांची जोडी title=
rohit sharma kl rahul t20 career

new t20 opening pair for 2024 t20 world cup: इंडियन प्रिमिअर लिग (IPL 2023) अंतीम टप्प्यात असतानाच पुढील काही महिन्यांमध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपचीही चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच या आयपीएलच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपची टीम कशी असू शकते, कोणाला संधी द्यावी कोणाला नाही याबद्दलची चर्चा आताच सुरु झाली आहे. दुसरीकडे बीसीसीआयनेही (BCCI) यंदाच्या आयपीएलपासूनच वर्षभरानंतर असलेल्या टी-20 वर्ल्डकप (t20 world cup) स्पर्धेसाठीची तयारी सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वीच टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्याच्या माध्यमातून बीसीसीआयने या तयारीची सुरुवात केली आहे. यंदाच्या आयपीएलनंतर जास्तीत जास्त नवीन खेळाडूंना मुख्य टी-20 संघात स्थान देण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

संधी मिळण्याची शक्यता कमी

ज्या वेगाने घडामोडी घडत आहेत आणि आयपीएलमध्ये नव्या दमाचे खेळाडू मैदान गाजवत आहेत ते पाहता नवीन संघच भारताकडून पुढील वर्षी टी-20 चा वर्ल्डकप खेळणार हे स्पष्ट आहे. तसेच सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि के. एल. राहुलला संधी मिळण्याची शक्यता फारच धुसर आहे. सध्या शुभमन गिलकडे सर्वच फॉरमॅटमधील भारताचा कायमस्वरुपी सलामीवीर म्हणून पाहिले जात आहे. तसेच यशस्वी जयस्वालने यंदाच्या आयपीएलमध्ये ज्याप्रकारची कामगिरी केली आहे ती पाहता तो एक उत्तम सलामीवीर म्हणून भारतीय संघात खेळू शकतो. यशस्वीच्या रुपाने सिलेक्टर्सला नवा पर्याय मिळाला आहे.

बीसीसीआयचे अधिकारी काय म्हणतात?

रोहित आणि राहुलला टी-20 च्या मुख्य संघात संधी मिळण्याची शक्यता कमी असली तरी आताच काही ठोस सांगता येणार नाही असं मत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने 'इनसाइडस्पोर्ट्स'शी बोलताना व्यक्त केलं. "जे प्रतिभावान खेळाडू आहेत त्यांना पाठिंबा दिला जाईल. त्यांची प्रतिभा ही भारतीय संघासाठी फार महतत्वाची आहे. यशस्वी जयस्वाल ज्यापद्धतीन घरगुती स्पर्धांमध्ये आणि आयपीएलमध्ये खेळत आहे ते पाहून त्याचा विचार नक्कीच केला जाऊ शकतो. मात्र त्याचवेळी राहुल आणि रोहितला संधी मिळणार नाही असं आताच संगणं थोडं घाईचं ठरेल. मात्र ज्यापद्धतीने दोघांच्या कामगिरीमध्ये सातत्याने पडझड होत आहे ते पाहता भारतीय संघाला नव्या सलामीवीरांची गरज नक्कीच आहे," असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

यशस्वीवर नजर, रोहितचा खराब फॉर्म

रोहित शर्मा सध्या चांगली कामगिरी करत नसून त्याच्या फॉर्मबद्दलची चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये रोहितने 11 सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात सरासरी 17 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 124 चा आहे. रोहितने एकूण 191 धावा केल्या आहेत. दुसरीकडे जयस्वाने 11 सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात 52 धावांच्या सरासरीने 167 च्या स्ट्राइक रेटने 575 धावा केल्या आहेत. त्यामुळेच यशस्वी हा सलामीवीर म्हणून प्रमुख दावेदार मानला जात आहे. मागील सामन्यात तर पहिल्याच चेंडूवर षटकार मारत इनिंगला सुरुवात करणाऱ्या यशस्वीने 13 चेंडूंमध्ये आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं होतं. तर शुभमने प्रत्येक सामन्यात 47 धावांच्या हिशेबाने 144 च्या स्ट्राइक रेटने 469 धावा केल्या आहेत.

राहुलची सुमार कमागिरी

के. एल. राहुलला दुखापत झाल्याने तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. मात्र त्याने जेवढे सामने खेळले त्यामध्ये त्याच्या सरासरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. त्याने 9 सामन्यामध्ये 113 च्या स्ट्राइक रेटने 274 धावा बनवल्या. टी-20 मध्ये हा स्ट्राइक रेट फारच सुमार मानला जातो. त्यामुळे या कामगिरीच्या जोरावर राहुलला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

शुभमन आणि यशस्वीला संधी देणार

रोहित आणि राहुल एकदिवसीय वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी करणार असून या वर्षाच्या शेवटी ही स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळेच आयर्लंडच्या दौऱ्यावर शुभमन आणि यशस्वीला सलामीवीर म्हणून संधी देण्याचा विचार सिलेक्टर्स करु शकतात. इथे या दोघांना चांगलं यश आलं तर टी-20 वर्ल्डकपआधीच रोहित आणि राहुलचा संघातून पत्ता कट होईल आणि निवडकर्त्यांना सलामीवीर म्हणून हीच जोडी वर्ल्डकपसाठी कायम ठेवता येईल.