IPL 2024 Rishabh Pant Health Update: गेले चौदा महिने क्रिकेटपासून दूर असलेला ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही याबाबत सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. बीसीसीआयने (BCCI) ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) मोठी अपडेट दिली आहे. ऋषभ पंत आता पूर्णपणे फिट असून आयपीएलच्या सतराव्या हंगामात (IPL 2024) तो खेळणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. पंतच्या पुनरागमनामुळे दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे पंत आयपीएलमध्ये फलंदाजी आणि विकेटकिपिंग अशी दुहेरी भूमिका पार पडणार असल्याचंही बीसीसीआयने म्हटलं आहे.
14 महिन्यांनंतर मैदानावर परतणार
30 डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर रिहॅब सेंटरमध्ये उपचार सुरु होते. आता 14 महिन्यांतर ऋषभ पंत पूर्णपणे तंदरुस्त झाला असून आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्साठी 'डबल रोल'
ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात पंत फलंदाजीबरोबरच विकेटकिपिंग करताना दिसणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य कोच रिकी पॉन्टिंग यांच्या समोरची मोठी समस्या संपली आहे. इतकंच नाही तर ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्वही करणार आहे. गेल्या हंगामात पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.
पंतची आयपीएल कारकिर्द
ऋषभ पंत आयपीएलमध्ये आतापर्यंत 98 सामने खेळला आहे. यात त्याने 2838 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर एक शतकही जमा आहे. 128 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 2016 मध्ये ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्समधून आयपीएलमध्ये पुनरागमन केलं. पहिला सामना तो दिल्लीच्य अरुण जेटली स्टेडिअणवर गुजरात लायन्सविरुद्ध खेळला. पहिल्याच सामन्यात पंतने 20 धावा केल्या होत्या.
पंतची क्रिकेट कारकिर्द
ऋषभ पंत टीम इंडियासाठी आतापर्यंत 33 कसोटी सामने खेळला असून यात त्ायने 2271 धावा केल्या आहेत. तर 30 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 865 धावा जमा आहेत. तर 66 टी20 सामन्यात त्याने 987 धावा केल्या आहेत.
पंत टी20 वर्ल्ड कप खेळणार?
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) खेळू शकल्यास टीम इंडियासाठी ही मोठी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. ऋषभ पंत हा आमच्यासाठी महत्वपूर्ण खेळाडू असून विकेटकिपिंग केल्यास टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल असंही जय शाह यांनी म्हटलंय. पण आयपीएलमध्ये पंत कशी कामगिरी करतो यावर त्याचं टी20 विश्वचषकाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.